हरिनामाच्या गजरात कोल्हापुरात ज्ञानेश्वर माउली पालखीची नगर प्रदक्षिणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 00:45 IST2025-07-06T00:43:46+5:302025-07-06T00:45:28+5:30
ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा भक्त मंडळातर्फे दरवर्षी माउलीच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते...

हरिनामाच्या गजरात कोल्हापुरात ज्ञानेश्वर माउली पालखीची नगर प्रदक्षिणा
कोल्हापूर : आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला हरीनामाचा गजर करत शनिवारी मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून ज्ञानेश्वर माउली पालखीची नगर प्रदक्षिणा पार पडली. ही पालखी आज प्रति पंढरपूर नंदवाळकडे प्रयाण करणार आहे.
ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळा भक्त मंडळातर्फे दरवर्षी माउलीच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचे पालखी सोहळ्याचे हे सलग २५ वे वर्ष आहे. यावेळी वैशाली रासकर, शुभांगी चव्हाण, जयश्री चव्हाण आणि ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे, वाहतूक नियंत्रक अधिकारी नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत आरती झाली. मिरजकर तिकटी येथून निघालेली ही पालखी बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड मार्गे भवानी मंडपात पोहोचली. तेथे उभे रिंगण पार पडले.
यानंतर पालखीने टिंबर मार्केट येथील सासने इस्टेट येथे विसावा घेतला. तेथे कीर्तनकार आनंदराव लाड महाराज यांचे कीर्तन आणि एम. पी. पाटील यांचे प्रवचन झाले. सासने परिवाराने महाप्रसादाचेही वाटप केले. दिंडी प्रमुख लाड महाराज, बाळासाहेब पवार, ॲड. राजेंद्र किंकर, एस. के. कुलकर्णी, अक्षय पवार आणि जय शिवराय फुटबॉल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोहळ्याचे आयोजन केले.