राम मगदूमगडहिंग्लज : आमदार शिवाजी पाटील यांनी नियोजित शक्तिपीठ महामार्गातचंदगड विधानसभा मतदारसंघाचा समावेश करावा, अशी मागणी राज्याच्या रस्ते विकास महामंडळाकडे नुकतीच केली आहे. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनीही कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांच्या प्रस्तावाला एकप्रकारे पुष्टीच दिली आहे. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गासाठी ‘कागल’ऐवजी गडहिंग्लज ‘चंदगड’च्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याची चर्चा गडहिंग्लज विभागात सुरू आहे.चार दिवसांपूर्वी आमदार पाटील यांनी मुंबई येथे रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांची भेट घेतली. शक्तिपीठ महामार्गात ‘चंदगड’चा समावेश करण्यासाठी चार मार्गही सुचविले तसेच जनतेला त्याचा कसा लाभ होईल, याबाबतची सविस्तर माहितीदेखील ‘पीपीटी’द्वारे दिली.चंदगड विधानसभा मतदारसंघातदेखील अनेक प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक किल्ले आणि निसर्गरम्यस्थळे आहेत. त्यामुळे चंदगड, गडहिंग्लज व आजरा हे तालुके शक्तिपीठ महामार्गावर आणल्यास पर्यटनवाढीला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल तसेच उद्योग, व्यवसाय वाढण्यासाठीही मदत होणार आहे. त्यामुळे ४ मार्गापैकी कोणत्याही एका मार्गाचा शक्तिपीठात समावेश करावा, अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.दरम्यान, शेतकऱ्यांचा विरोध नसेल तर शक्तिपीठ महामार्ग ‘चंदगड’मधून जाण्यास हरकत नाही, असे मत मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केले असून ते महायुती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री व जिल्ह्याचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाबद्दल गडहिंग्लज विभागासह जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
सोमवारी गडहिंग्लजला सर्वपक्षीय बैठकआमदार शिवाजी पाटील यांनी शक्तिपीठ महामार्गात समावेश करण्यासाठी सुचवलेल्या चारही मार्गावरील अल्प भूधारक शेतकऱ्यांची शेकडो एकर पिकाऊ बागायती जमीन जाणार आहे शिवाय नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबरच पर्यावरणाचीही कधीही भरून न येणारी हानी होणार आहे. म्हणूनच शक्तिपीठात ‘चंदगड’चा समावेश करण्यास आमची हरकत आहे.यासंदर्भात विचारविनियम आणि पुढील दिशा ठरविण्यासाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक सोमवारी (दि.७) दुपारी १२ वाजता गडहिंग्लज येथे आयोजित केली आहे, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष व शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. संपत देसाई यांनी दिली.