Kolhapur: दूधगंगा धरणातून ३५०० क्युसेकने विसर्ग सुरू, धरण परिक्षेत्रात पावसाचा जोर-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:32 IST2025-07-28T12:29:21+5:302025-07-28T12:32:04+5:30
नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

छाया-सुभाष मोरे
सोळांकूर : राधानगरी तालुक्यातील दूधगंगा (काळम्मावाडी) धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा धरणामध्ये पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे धरणात २०.९२ टीएमसी म्हणजे ८३ टक्के पाणीसाठा झाला आहे. परिचलन सुचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी दुपारी धरणाच्या सांडव्यावरून २ हजार क्युसेक्स व वीजनिर्मिती गृहातून १५०० क्युसेक, असा एकूण ३५०० क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणी विसर्गामुळे दूधगंगा नदीपात्रामधील पाणी पातळीत वाढ होत आहे. दुधगंगा नदीकाठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राधानगरी तालुक्यात गेले चार दिवस वादळीवाऱ्यासह पावसाची संततधार सुरू असून, काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात पावसाचा जोर अधिक आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. रविवारी धरण परिक्षेत्रात ७० मिमी, तर आजअखेर २६७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. योग्य पाणीपातळी ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाने धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू केला आहे.
पावसाचे प्रमाण, पाण्याची आवक यानुसार पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, नदीकाठावरील सर्व ग्रामस्थ, शेतकरी यांनी नदीपात्रमध्ये उतरू नये, नदीपात्रालगत असणारे साहित्य, जनावरे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात यावीत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केले आहे.