डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा म्होरक्या पुण्यातून ताब्यात, कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेस घातला होता ३ कोटींना गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:31 IST2025-06-11T13:31:02+5:302025-06-11T13:31:29+5:30

चौथा संशयित पोलिसांच्या हाती : आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता

Digital arrest fraud ringleader arrested from Pune, A retired professor from Kolhapur was cheated of Rs 3 crores | डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा म्होरक्या पुण्यातून ताब्यात, कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेस घातला होता ३ कोटींना गंडा 

डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा म्होरक्या पुण्यातून ताब्यात, कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेस घातला होता ३ कोटींना गंडा 

कोल्हापूर : सेवानिवृत्त प्राध्यापिकेस डिजिटल अरेस्ट करण्याची भीती घालून ३ कोटी ५७ लाखांचा गंडा घालणाऱ्या सायबर भामट्यांच्या टोळीतील म्होरक्याला राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी पुण्यातून जेरबंद केले. या गुन्ह्यातील चौथा संशयित पोलिसांच्या हाती लागला असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या टोळीने फसवणूक करून विविध खात्यांवर जमा केलेली रक्कम पुण्यातील बँकांमधून काढल्याची माहिती चौकशीतून समोर येत आहे.

मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग असल्याची भीती घालून सायबर भामट्यांनी सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना मुरलीधर डोंगरे (वय ७५, रा. सम्राटनगर, कोल्हापूर) यांना ३ कोटी ५७ लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी गेल्या आठवड्याभरात तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून या गुन्ह्याच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले आहे.

त्याला पुण्यातून ताब्यात घेतले असून, त्यानेच पुण्यातील बँकांमधून पैसे काढल्याचे चौकशीत समोर आले आहे. या गुन्ह्यातील रकमा देशभरातील विविध बँकांमधील खात्यांवर जमा झाल्या होत्या. ते पैसे पुढे पुण्यातील बँकांमध्ये वर्ग करण्यात आले होते. त्यावरून पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. यांच्या चौकशीत आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

४० सीमकार्डचा वापर

या गुन्ह्यात सायबर भामट्यांनी बारा मोबाईल आणि चाळीस सीमकार्डचा वापर केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. सर्व मोबाईल आणि सीमकार्ड पुण्यातील म्होरक्यानेच खरेदी केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि सीमकार्ड जप्त केले जाणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हॉटेलमध्ये पोलिस ठाणे, न्यायालयाचा सेटअप

पोलिसांनी या गुन्ह्यातील म्होरक्याला ताब्यात घेताच तो राहत असलेल्या पुण्यातील हॉटेलची झडती घेतली. त्यावेळी हॉटेलच्या एका रुममध्ये पोलिस ठाणे आणि न्यायालयाचा सेटअप तयार केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापेमारी केली तेव्हाही तिथे फसवणुकीचा प्रकार सुरू होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Digital arrest fraud ringleader arrested from Pune, A retired professor from Kolhapur was cheated of Rs 3 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.