शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, पर्यायी कसा नेणार ते सांगा; कोल्हापुरात धरणे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:29 IST2025-01-25T12:29:06+5:302025-01-25T12:29:24+5:30

शेतकरी संघर्ष समिती आक्रमक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Dharna movement in Kolhapur by Shaktipeeth Anti Highway Sangharsh Samiti | शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, पर्यायी कसा नेणार ते सांगा; कोल्हापुरात धरणे आंदोलन

शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक, पर्यायी कसा नेणार ते सांगा; कोल्हापुरात धरणे आंदोलन

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग रद्द न झाल्याने कोल्हापुरातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे हा महामार्ग कोल्हापुरातून कसा नेणार, याचे नोटिफिकेशन काढा अशी मागणी करत शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

संपूर्ण शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, शेतकरी वाचवा, देश वाचवा, जय जवान, जय किसान, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनामध्ये शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, भुदरगड व आजरा या सहा तालुक्यांतील शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनानंतर पालकमंत्री प्रकाश आबिटकर व निवासी जिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

फोंडे म्हणाले, महामार्गाला फक्त कोल्हापुरातून विरोध आहे, हे खोटे आहे. दहा जिल्ह्यांतील आंदोलनाने त्यांचे खोटे उघडे पडले आहे. कोल्हापुरात दोन मंत्र्यांनी सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा. यावेळी शिवाजी मगदूम, शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील, सम्राट मोरे, शामराव पाटील, सुरेश संकपाळ यांची भाषणे झाली.

महामार्ग रद्दच, चुकीचा प्रचार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा

भुदरगड मतदारसंघात काही एजंट हे महामार्ग पाहिजे असा प्रचार करत आहेत. त्यांच्यावर जरब बसवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री आबिटकर यांच्याकडे केली. यावर आबिटकर यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द केला आहे, त्यामुळे महामार्ग करा, असा चुकीचा प्रचार करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, असे शेतकऱ्यांना सांगितले.

या केल्या मागण्या

  • कोल्हापुरातील सहा तालुक्यांतील अधिसूचना रद्द केल्याच्या शासन आदेशाप्रमाणे हा महामार्ग कोल्हापुरातून कसा जाणार, याचा उल्लेख असलेले नोटिफिकेशन काढा.
  • काही तालुक्यांमध्ये सुपाऱ्या घेऊन एजंटगिरी करणारे शक्तिपीठ महामार्ग करा, असे सांगत आहेत अशांना सत्ताधारी आमदारांचे समर्थन आहे काय, याचे स्पष्टीकरण द्यावे.

Web Title: Dharna movement in Kolhapur by Shaktipeeth Anti Highway Sangharsh Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.