नितीन भगवानपन्हाळा : पन्हाळ्याचा रणसंग्राम लघुपटाद्वारे दाखविला जातो, त्या इमारतीला धुवांधार पावसामुळे गळती लागली आहे. काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नगर परिषद प्रशासन घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ७ मार्चला थाटामाटात उद्घाटन झालेल्या पन्हाळा गिरिस्थान नगर परिषदेच्या मालकीच्या इंटरप्रिटेशन सभागृहात ‘पन्हाळ्याचा रणसंग्राम’ हा बावीस मिनिटांचा लघुपट रोज प्रेक्षकांना दाखवला जातो. सध्या दिवसातून चार वेळेस व शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी सहा ते आठ वेळेस दाखविला जातो.
धुवांधार पावसामुळे या इमारतीला गळती लागल्याने व इमारतीच्या भिंती भिजल्याने दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी कोणाची? सुमारे चौदा कोटी रुपये खर्ची पडलेल्या इमारतीच्या पहिल्याच पावसात कुठे पाणी मुरलंय, याची चौकशी व्हावी, अशी मागणी नगरवासियांची आहे.२००८ साली महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने इंटरप्रिटेशन सभागृह बांधले ते २०२४ पर्यंत वापराविना पडुन होते त्या इमारतीची थोडीफार डागडुजी करून सुमारे सोळा वर्षाने या इमारतीत छत्रपतींचा इतिहास लघुपटा द्वारे दाखविला जात आहे इमारत वापराविना असल्याने त्याचा भक्कमपणा तपासला गेलेला नाही. संपूर्ण इमारतीला बसविलेले पत्रे अत्यंत हलक्या दर्जाचे वापरून त्यावर पावसाचे पाणी थांबू नये, म्हणून जलरोधक करणे आवश्यक होते ते केलेले नाही, तर इमारतीच्या आतील बाजूस भक्कम असे छत पण केलेले नाही.गळती लागल्याने पावसाचे पाणी पडत असलेले आतील छत कोणत्याही क्षणी कोसळणार अशी स्थिती असून, भिंतींना लावलेल्या रंगाने आपला जुना रंग दाखवायला सुरुवात केली आहे. मग, या ठिकाणी खरेच चौदा कोटी रुपये खर्ची पडलेत काय, याची चौकशी जनतेसमोर येईल काय?
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या लघुपटाच्या उद्घाटनामुळे घाईगडबडीने लोकार्पण सोहळा झाला. इमारतीवरील पत्र्यावर जलरोधक काम केलेले नाही. पावसाळा संपताच राहिलेले काम करून घेतले जाणार आहे, तसेच काही दुर्घटना होण्याची शक्यता वाटल्यास लघुपट बंद ठेवण्यात येईल. - मुख्याधिकारी चेतन कुमार माळी