चंदगड : चंदगड तालुक्याला मी भरभरून दिले. पण गेल्या विधानसभा निवडणुकीत माझ्या शिलेदाराचा पराभव झाला. याचे माझ्या मनात शल्य असून गड आला पण सिंह गेला त्यामुळे मी फेटा बांधणार नाही. पाटील यांना पुन्हा आमदार करा मी एक नाही हजार फेटे बांधायला तयार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. अडकूर येथे आज, शुक्रवारी चंदगड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेसह सर्व योजनांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात मोठ्या निधीची तरतूद केली आहे. राजेश पाटील यांनी कोट्यवधीची विकासकामे करूनही त्यांचा पराभव झाला याची मला खंत आहे. मरगळ झटकून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करा मी मनापासून तुम्हाला साथ देईन, अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी राजेश पाटील यांना दिली. प्रारंभी कै. नरसिंगराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. राजेश पाटील म्हणाले, माझे नेते अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मी शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहणार. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता आणून त्यांचे राज्यातील स्थान अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगताना ते भावूक झाले. हिमालयासारखा पाठिशी राहूमाजी आमदार पाटील यांनी विकासकामात आघाडी घेतलीच आहे. पण वैयक्तिक पातळीवर लोकांच्या कामात त्यांनी अधिक लक्ष घातल्यास पुढे त्यांना काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे माझ्या सल्ल्याचा त्यांनी विचार करावा. येत्या काळात त्यांच्यासह कार्यकर्त्यांच्या पाठिशी हिमालयासारखं राहू, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, संतोष पाटील, सुधीर देसाई, शितल फराकटे, भरमाण्णा गावडा, भिकू गावडे, रामाप्पा करीगार, अनिल साळोखे, सतीश पाटील, निखिल पाटील, संगिता पाटील, हेमांगी देसाई, तानाजी गडकरी, पांडुरंग बेनके यासह कार्यकर्ते उपस्थित होते
Kolhapur: राजेश पाटील भावूक झाले, अजित पवार यांनी बांधला नाही फेटा; चंदगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 18:38 IST