Kolhapur: त्रास न देण्यासाठी २० लाखांची मागणी, माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी घेताना मध्यरात्री अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 11:36 IST2025-06-24T11:36:11+5:302025-06-24T11:36:33+5:30
कोळी याला ३० हजार रूपयांची खंडणी रक्कम स्वीकारताना पकडले

Kolhapur: त्रास न देण्यासाठी २० लाखांची मागणी, माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीला खंडणी घेताना मध्यरात्री अटक
कोल्हापूर : येथील माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज भिमराव कोळी (रा. हाॅकी स्टेडियम कोल्हापूर) आणि त्याचा सहकारी युवराज मारूती खराडे (रा. उचगाव ता. करवीर) या दोघांना कागलजवळील लक्ष्मी टेकडीजवळ खंडणीची रक्कम घेताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली. सीपीआरमधील वैद्यकीय उपकरणे पुरवठादार अजिंक्य पाटील यांच्याकडून तो ही रक्कम स्वीकारत होता.
पाटील यांच्याविरोधात कोळी याने अनेक तक्रारी केल्या होत्या. यातून पाटील यांना अटकही झाली होती. यापुढच्या काळात त्रास न देण्यासाठी २० लाख रूपयांची मागणी कोळी याने केली होती. पाटील यांनी १५ लाख रूपये देण्याचे मान्य केले.
यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला पाटील यांनी ही माहिती दिल्यानंतर या विभागाने त्यांच्याकडील ३० हजार रूपये पाटील यांना दिले आणि मध्यरात्री कागलजवळील राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मी टेकडी येथे खंडणीची रक्कम घेण्यासाठी कोळी याला बोलावण्यात आले.
त्यानुसार कोळी याला ३० हजार रूपयांची खंडणी रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले. त्याच्यासह सहकाऱ्यावरही कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण रोख रकमेसह चारचाकी वाहन, मोबाईल असा ५ लाख ८० हजाराचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.