सरकारची बदनामी, कोल्हापुरातील व्यंकटराव हायस्कूलवर कारवाई करा; विधान परिषदेत मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:34 IST2025-07-17T17:33:27+5:302025-07-17T17:34:08+5:30
पत्रावर मुख्याध्यापकांची सही व शिक्का

सरकारची बदनामी, कोल्हापुरातील व्यंकटराव हायस्कूलवर कारवाई करा; विधान परिषदेत मागणी
कोल्हापूर : मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना या महाराष्ट्रात अस्तित्वातच नसलेल्या योजनेबद्दल सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करून राज्य शासनाची बदनामी केल्याबद्दल इचलकरंजीच्या व्यंकटराव हायस्कूलवर कारवाई करण्याची मागणी विधानपरिषदेत बुधवारी नागपूरचे आमदार संजय जोशी यांनी केली.
‘लोकमत’मध्ये यासंदर्भातील सोशल व्हायरल प्रसिद्ध झाले होते. पीठासन अधिकाऱ्यांनी या प्रकाराची राज्य शासनाने नोंद घेऊन संबंधित शाळेकडून स्पष्टीकरण मागवावे अशा सूचना केल्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेली योजनेसंबंधीची माहिती या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे यांनी जास्तीत जास्त पालकांना लाभ व्हावा, या हेतूने टायपिंग करून घेतली. त्यावर हायस्कूलचा शिक्का मारून स्वत:च्या सहीने नोटीस फलकावर लावली. कुणीतरी पालकांनी त्याचा फोटो काढून ती सोशल मीडियावर व्हायरल केल्याने पालकांत गोंधळ उडाला. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले.
महाराष्ट्र शासनाची अशी योजनाच नसल्याने या योजनेबद्दल माहिती देऊन लोकांत गैरसमज पसरविण्याचे काम संबंधित हायस्कूलने केल्याची बाब आमदार जोशी यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. या पत्रावर मुख्याध्यापकांची सही व शिक्काही असल्याने तेच याला जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली.
राज्य शासनाकडून अस्तित्वात नसलेल्या योजनेची जाहिरात शाळेच्या नोटीस बोर्डवर लावून शासनाची व पालकांची दिशाभूल व फसवणूक केली. त्यामुळे अशी खोटी माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल मुख्याध्यापिका कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे यांना दिले.
मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे यांना या प्रकाराबद्दल कारणे दाखवा नोटिसा बजावली आहे. त्यांनी कोणत्या नियमान्वये ही माहिती प्रसारित केली याचा खुलासा मागविला आहे. - सुहास वाईंगडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कोल्हापूर.