अन्यायी तिकिटदरप्रश्नी १५ दिवसांत निर्णय

By Admin | Updated: January 10, 2015 00:24 IST2015-01-09T22:12:17+5:302015-01-10T00:24:23+5:30

मुत्नाळ ग्रामस्थांना आगारप्रमुखांची ग्वाही : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

Decision in 15 days in case of unjust ticket | अन्यायी तिकिटदरप्रश्नी १५ दिवसांत निर्णय

अन्यायी तिकिटदरप्रश्नी १५ दिवसांत निर्णय

गडहिंग्लज : संकेश्वर ते मुत्नाळ या एका टप्प्याच्या अंतरासाठी आकारल्या जाणाऱ्या दोन टप्प्याच्या अन्यायी तिकिटदरप्रश्नी विभागीय कार्यालयाकडे पाठपुरावा करून १५ दिवसांत सकारात्मक निर्णय देण्याची ग्वाही गडहिंग्लज आगाराचे प्रमुख सुनील जाधव यांनी मुत्नाळ ग्रामस्थांना दिली. त्यामुळे याप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित रास्ता रोको आंदोलन स्थगित केले.
मुत्नाळ हे गाव गडहिंग्लज ते संकेश्वर मार्गावर आहे. मुत्नाळ ते संकेश्वर हे अंतर केवळ ५ किलोमीटर असतानाही त्यासाठी १३ रूपये, तर मुत्नाळ ते गडहिंग्लज १० किलोमीटर अंतरासाठी ९ रूपये तिकिटाची आकारणी केली जाते. मुत्नाळप्रमाणेच निलजी व हेब्बाळच्या ग्रामस्थांना या अन्यायी तिकिटदर आकारणीचा भुर्दंड बसतो. याप्रश्नी ‘लोकमत’ने ‘सीमाभागातील प्रवाशांची एस.टी.कडून लूट’ या मथळ्याखालील बातमीने वाचा फोडली होती. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीतर्फे मुत्नाळ येथे रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता.
विभाग नियंत्रकांना निवेदन देवूनही ८ दिवसांत कार्यवाही न झाल्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मुत्नाळच्या बसथांब्यासमोर रास्ता रोकोसाठी जमले होते. त्याठिकाणी भेट देवून आगारप्रमुख जाधव यांनी याप्रश्नी वरिष्ठांशी संपर्क साधून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिल्यामुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
सीमाभागातील कोगनोळी-कागल, निपाणी-अर्जूननगर, बोरगाव-इचलकरंजी, संकेश्वर-नांगनूर या ठिकाणच्या अंतरासाठी एका टप्प्याच्या तिकिटाची आकारणी केली जाते. मग, मुत्नाळसाठी वेगळा न्याय का? चुकीच्या आकारणीमुळे निलजी व हेब्बाळच्या ग्रामस्थांनाही भुर्दंड बसत आहे. याप्रश्नी निर्णय न झालेस तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा गड्यान्नावर यांनी यावेळी दिला. सरपंच आण्णासाहेब पाटील, निलाप्पा बाडकर, शिवगोंडा पाटील, हणमंतगौडा पाटील, लगमाण्णा पाटील, केंप्पाण्णा मुरगी, अर्जुन गिजवणे, केंप्पाण्णा जाधव उपस्थित होते. पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त होता. (प्रतिनिधी)

Web Title: Decision in 15 days in case of unjust ticket