कर्जबाजारी चालकाने मारला मालकाच्या दागिन्यांवर डल्ला, कोल्हापूर पोलिसांनी १२ तासांत गुन्हा उघडकीस आणला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:01 IST2025-06-14T17:59:44+5:302025-06-14T18:01:28+5:30

दोन आरोपींना अटक, ५० लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Debt ridden driver steals owner 44 tolas of jewellery Kolhapur police solves crime in 12 hours | कर्जबाजारी चालकाने मारला मालकाच्या दागिन्यांवर डल्ला, कोल्हापूर पोलिसांनी १२ तासांत गुन्हा उघडकीस आणला 

कर्जबाजारी चालकाने मारला मालकाच्या दागिन्यांवर डल्ला, कोल्हापूर पोलिसांनी १२ तासांत गुन्हा उघडकीस आणला 

कोल्हापूर : कर्जबाजारी झालेल्या चालकाने मालकाच्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला. सम्राटनगरात घरात घुसून आजोबांना चाकूचा धाक दाखवत दोन चोरट्यांनी ४४ तोळे दागिने ठेवलेले डिजिटल लॉकर लुटले होते. या प्रकरणाचा बारा तासांत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने उघडकीस आणला. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मी टेकडी येथे सापळा रचून दोघांना वाहन, मुद्देमालांसह अटक केली.

चालक प्रकाश दत्तात्रय चौगुले (वय ३८, रा. हंचनाळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव) आणि गुन्ह्यात सहभागी असलेला त्याचा साथीदार अमित विश्वनाथ शिंदे (वय २५, रा. यादवनगर, डवरी वसाहत, कोल्हापूर) या दोघा आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ४४० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोख ७५ हजार रुपये, असा एकूण ५० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

अधीक्षक डॉ. बच्चू म्हणाले, लक्ष्मी लाडा पंप कंपनीचे मालक राजू जयकुमार पाटील (वय ६०, रा. गोविंदराव हौसिंग सोसायटी, सम्राटनगर) यांच्या घरात घुसून आजोबांना चाकूचा धाक दाखवत दोन चोरट्यांनी ४४ तोळे दागिने ठेवलेले डिजिटल लॉकर लुटले होते. ओळख पटू नये म्हणून हेल्मेट घालून चोरी केली होती. हा प्रकार १२ जूनला दुपारी तीन ते सव्वातीनच्या दरम्यान घडला होता. भर दुपारी घडलेल्या जबरी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

त्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी या चोरीचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या चार पथकांकडून चोरट्यांचा शोध सुरू होता. पाटील यांच्या ओळखीच्या व्यक्तीनेच ही चोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करून तपास सुरू केला.

पथकातील पोलिस अंमलदार सुरेश पाटील यांना पाटील यांच्या गाडीवरील चालक आणि त्याच्या साथीदाराने ही चोरी केल्याची माहिती मिळाली. या दोघांचे मोबाइल लोकेशन तपासले. ते लक्ष्मी टेकडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी पथकाने सापळा रचला. ते एका चारचाकी वाहनातून पसार होण्याच्या तयारीत होते. त्या वेळी पथकाने टाकलेल्या छाप्यात दोघेही सापडले. त्याच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या डिकीत तीन लहान लॉकर, दोन बँगा, चाकू, दोन हेल्मेट, रेनकोट असे साहित्य सापडले. त्यांच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी पाटील यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली.

चारचाकी आणि एक दुचाकी गाडी जप्त

चालक चौगुले याला पाटील यांच्या घरातील सर्व साहित्याची माहिती होती. त्याने घराच्या बाहेरील बाजूस ठेवलेली चावीने कुलूप काढून घरात प्रवेश केला होता. वयस्कर सासू-सासऱ्यांना चाकूचा धाक दाखवून धाडसी चोरी केली होती. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चारचाकी वाहन जप्त केले आहे.

Web Title: Debt ridden driver steals owner 44 tolas of jewellery Kolhapur police solves crime in 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.