कोल्हापूर : वैरणीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा विद्युत तारेचा शॉक बसून मृत्यू झाला. राजेंद्र भाऊ वळीवडे (वय ५३ रा. वसगडे, ता. करवीर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळी वसगडेतील जुना मळा या शेतात घडली.याबाबत पोलिसांनी व नातेवाइकांनी दिलेली माहिती अशी की, राजेंद्र वळीवडे हे शेतकरी असून रोज सकाळी आपल्या शेतात जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी जातात. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे वैरणीसाठी गेले होते. बराच उशिरा घरी न परतल्यामुळे त्याचा पुतण्या त्यांना शोधण्यासाठी शेतात गेला. पण त्यावेळी लोंबकळणाऱ्या विद्युत तारेचा शॉक बसून ते बेशुद्ध पडल्याचे आढळले.नातेवाइकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात दाखल केले, पण उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.तक्रारीनंतरही वीज मंडळाचे दुर्लक्षवसगडे येथे उसाच्या शेतात विद्युत तार लोंबळकत असल्याची लेखी तक्रार मृत राजेंद्र वळीवडे यांनी आठवड्यापूर्वीच वीज मंडळाच्या उपक्रेंद्रात दिल्याची माहिती त्याच्या नातेवाइकांनी दिली. पण तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांचा बळी गेल्याचा आरोप नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात केला.
कोल्हापूर: विद्युत तारेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्यापूर्वीच याबाबत केली होती तक्रार
By तानाजी पोवार | Updated: July 25, 2022 17:13 IST