निवडणुकीची ईर्षा पुणे, साताऱ्यात, ट्रॅव्हल्सनी ट्रॅफिक जाम कोल्हापुरात; पोलिसांची तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:20 IST2025-11-11T18:18:22+5:302025-11-11T18:20:18+5:30
Local Body Election: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून मतदारांसाठी देवदर्शन सहली सुरू

छाया-नसीर अत्तार
कोल्हापूर : नगरपालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील इच्छुक उमेदवारांकडून मतदारांसाठी देवदर्शन सहली सुरू आहेत. सोमवारी शहरात पुणे, साताऱ्यातील एकाच वेळी १२० खासगी ट्रॅव्हल्स आल्याने वाहतुकीची कोंडी झाली. नागरिक हैराण झाले, तर वाहतूक शिस्तीसाठी पोलिसांची तारांबळ उडाली.
निवडणुकांपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अनेक फंडे वापरले जातात. यातीलच एक प्रचलित प्रकार म्हणजे मतदारांना देवदर्शनाच्या सहली घडविल्या जातात. सातारा आणि पुणे जिल्ह्यातून सोमवारी सकाळी ४० ट्रॅव्हल्स कोल्हापुरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खानविलकर पेट्रोलपंप येथील १०० फुटी रोडवर पार्किंगची व्यवस्था केली होती. त्यासाठी बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, प्रत्यक्षात पुणे जिल्ह्यातून ८० आणि सातारा जिल्ह्यातून ४० अशा एकूण १२० ट्रॅव्हल्स सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कोल्हापुरात पोहोचल्या.
एकाच वेळी मोठ्या संख्येने आलेल्या वाहनांमुळे दसरा चौक ते खानविलकर पेट्रोलपंप आणि कसबा बावडा रोडवर वाहतूककोंडी झाली. यातच जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या दौलत कारखाना मोर्चामुळेही गर्दीत भर पडली. यामुळे कसबा बावडा ते सीपीआर चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवर नागरिकांना पुढे जाणे मुश्कील झाले.
अंबाबाईसह जोतिबा, बाळूमामाचे दर्शन
खानविलकर पेट्रोलपंप परिसर, पंचगंगा नदी घाट, एस्तर पॅटर्न हायस्कूल आणि दसरा चौकात ट्रॅव्हल्स पार्क करून वाहतूककोंडीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यानंतर सातारा आणि पुण्यातून आलेल्या भाविक मतदारांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. कोल्हापुरातील दर्शनानंतर ही वाहने आदमापूर आणि ज्योतिबा दर्शनासाठी रवाना झाली.
मतदारांची वर्दी, शहरात गर्दी
निवडणुकीचे वातावरण तापत असल्याने येणाऱ्या दोन आठवड्यांत देवदर्शनासाठी सहलींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांना पार्किंगचे नियोजन करावे लागणार आहे. कोल्हापूरसह आदमापूर आणि ज्योतिबा डोंगर येथेही वाहतूककोंडी टाळण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.