कळंब्यासह उपनगरांवर पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:26+5:302021-01-21T04:21:26+5:30

कळंबा : जानेवारीच्या अखेरीस कळंबा तलावातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, आजमितीला पाणीपातळी वीस फुटांवर पोहोचली आहे. ...

Crisis of water scarcity in suburbs including Kalambya | कळंब्यासह उपनगरांवर पाणीटंचाईचे संकट

कळंब्यासह उपनगरांवर पाणीटंचाईचे संकट

कळंबा : जानेवारीच्या अखेरीस कळंबा तलावातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत असून, आजमितीला पाणीपातळी वीस फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे कळंबा परिसरासह उपनगरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार उभी राहिली आहे. तलावातील जलचरांच्या अस्तित्वासाठी सात फूट मृत पाणीसाठा पावसाळ्यापर्यंत शिल्लक ठेवावा लागतो. उपलब्ध मर्यादित पाणीसाठा ऐन उन्हाळा संपेपर्यंत पुरवण्यासाठी प्रशासनास यंदा तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी पाणीउपसा नियोजन करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात कळंबा तलावाची पाणीपातळी २७ फुटांवर गेली की तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहतो. आजमितीला कळंबा तलावातून कळंबा ग्रामपंचायत रोज दहा तास पाणी उपसा करते. उपनगरांसाठी तलावातून कळंबा फिल्टर हाऊसकडे चोवीस तास पाणी उपसा सुरू असतो. पुढे हे पाणी बी वॉर्ड मंगळवार पेठेत वितरित होते. यातील पाणी सुभाषनगर पंपिंग स्टेशनमध्ये सोडून आर. के. नगर, मोरेवाडी, सुभाषनगर, वर्षानगरास दिले जाते. गरजेनुसार पाचगाव ग्रामपंचायत तलावातून पाणीउपसा करते; मात्र कोणत्या प्रशासनाने किती पाणीउपसा करावा, याचे नियोजन पालिका प्रशासनाने तत्काळ न केल्यास ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वादावादी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माळवाडी कात्यायनी कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या जलवाहिणीस लागलेल्या गाळत्यांमधून लाखो लिटर पाणी वाया जात असून, गळती शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.

चौकट: पाणी वापरता...मग जबाबदारीही घ्या

कळंबा गाव पाण्यासाठी पूर्णतः कळंबा तलावावर अवलंबून आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली की पालिकेच्या पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी वापरले जाते. ग्रामपंचायत प्रशासनाने लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवली आहे. तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरणारी कळंबा ग्रामपंचायत तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या प्रश्नी मात्र हात वर करते, हे विशेष.

Web Title: Crisis of water scarcity in suburbs including Kalambya