Kolhapur- Phulewadi Fire Station building slab collapses: ठेकेदार शशिकांत पोवार अटकेत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:11 IST2025-10-01T16:10:43+5:302025-10-01T16:11:53+5:30
कामात तांत्रिक त्रुटी ठेवल्याचा ठपका

Kolhapur- Phulewadi Fire Station building slab collapses: ठेकेदार शशिकांत पोवार अटकेत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
कोल्हापूर : फुलेवाडी येथे महापालिकेच्या फायर स्टेशनच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी ठेकेदार शशिकांत दिलीप पोवार (वय ४५, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला.
महापालिकेतील कनिष्ठ अभियंता प्रमोद सुधीर बराले (४९, रा. हॉकी स्टेडियमजवळ, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी ठेकेदार पोवार याला अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता, त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.
फुलेवाडी येथे फायर स्टेशनच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. दुसऱ्या मजल्याचा स्लॅब टाकताना मंगळवारी (दि. ३०) रात्री नऊच्या सुमारास अचानक स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत दोन महिलांसह सहाजण जखमी झाले. स्लॅबच्या मलब्याखाली दबलेले मजूर नवनाथ आण्णाप्पा वडर (३४, रा. शाहूनगर, कोल्हापूर) यांचा श्वास गुदमरून आणि डोक्याला दुखापत होऊन मृत्यू झाला. तसेच इतर पाच मजूर जखमी झाले.
याप्रकरणी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांनी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ठेकेदार शशिकांत पोवार याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली. पोलिस निरीक्षक संजीव झाडे आणि सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटोळे अधिक तपास करीत आहेत.
निष्काळजीपणे काम केल्याचा ठपका
दुर्घटना घडून जीवितहानी होऊ शकते याची कल्पना असूनही स्लॅबच्या कामात तांत्रिक चुका ठेवल्याचा ठपका ठेकेदारावर ठेवला आहे. पाच मजूर जखमी आणि एकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदारावर बीएनएस कलम १०५ आणि १२५ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास ठेकेदारास आजन्म कारावास किंवा पाच ते १० वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
गळती लागून स्लॅब कोसळला
स्लॅबचे काम अंतिम टप्प्यात असताना मध्येच एक प्लेट निसटल्याने मलबा कोसळू लागला. काही क्षणांत मोठा आवाज होऊन पूर्ण स्लॅब कोसळला. यावेळी काही मजुरांनी बाजूला उड्या टाकल्या, तर काही मजूर मलब्याखाली अडकल्याची माहिती जखमींनी पोलिसांना दिली. मालवाहू लिफ्टचा धक्का लागून स्लॅब कोसळल्याची चर्चा मंगळवारी रात्री सुरू होती.