Kolhapur: विशाळगडाच्या ढासळलेल्या बुरुजाचे बांधकाम गतिमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 19:43 IST2026-01-15T19:43:34+5:302026-01-15T19:43:47+5:30
अर्थवट अवस्थेत बांधलेला बुरुज तीन वर्षापूर्वी अतिवृष्टीने कोसळला होता.

Kolhapur: विशाळगडाच्या ढासळलेल्या बुरुजाचे बांधकाम गतिमान
आंबा : विशाळगड येथील अर्थवट अवस्थेत बांधलेला बुरुज तीन वर्षापूर्वी अतिवृष्टीने कोसळला होता. त्या बुरुजाचे बांधकाम गेल्या महिन्यात सुरू झाले. किल्ले विशाळगडच्या प्रथम दर्शनी बुरुजाच्या बांधणीस पुरातत्व विभागाच्यावतीने (पुणे ) ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
गडाच्या बुरुजासह गडावर जाणाऱ्या दगडी पायऱ्या बसविण्याचे कामही चालू आहे. बुरुजालगत दोन दगडी कमानी आहेत त्यांची बांधणी होण्याची गरज आहे. बोरावडे (ता. भुदरगड) येथील त्रिवेणी कन्स्ट्रक्शन हे काम पहात आहे. बुरुजाचे काम सुबक व मजबूत होण्यासाठी ताशीव दगडामध्ये चुना, बेलफळ, गूळ, तुरटी व उडीद आदी साधनसामुग्री वापरली जात असल्याचे त्रिवेणी कन्स्ट्रक्शन प्रमुख महादेव फराकटे यांनी सांगितले.
सुमारे एकशे साठ फूट गोलाकार लांबीच्या बुरुजाचा खालील टप्पा पूर्ण होत आला आहे. यावर दोन टप्पे दगडी चिरेबंदी काम येत्या दोन महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंढा दरवाजा व बुरुजाच्या बांधणीमुळे गडाचे अस्तित्व खुलत आहे.
२०१८ मध्ये शेजारील दोन बुरुजाचे बांधकाम झाले आहे. शिडीने जाणाऱ्या मार्गावरील डाव्या बाजूच्या दोन बुरुजाचेही दगड काळाच्या ओघात दरीत कोसळले आहेत. विशाळगडावरील शिवकालीन इतिहासाचा वारसा जपायचा असेल तर भग्नावस्थेतील बुरुज, तटबंद्या व पाणी वाहून नेणारी गटारे यांची बांधणी व्हावी, अशी मागणी होत आहे.