Kolhapur Politics: ..म्हणून हक्कभंगाची भाषा, सतेज पाटील यांची राजेश क्षीरसागरांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:10 IST2025-10-03T13:06:23+5:302025-10-03T13:10:11+5:30
अग्निशमन विभागाच्या इमारतीच्या कामाचे टेंडर कोणाच्या दबावाखाली देण्यात आले. याचे सत्य जनतेसमोर आले पाहिजे.

Kolhapur Politics: ..म्हणून हक्कभंगाची भाषा, सतेज पाटील यांची राजेश क्षीरसागरांवर टीका
कोल्हापूर : आमदार राजेश क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांनी दुसरे काहीतरी काम ऐकले नसेल, म्हणून ते अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणतो, असे म्हणत असतील; नुसते अधिकाऱ्यांना बोलण्याने आणि हक्कभंग आणतो वगैरे बोलून उपयोग नाही. त्यांनी आता लगेच हक्कभंग आणावा अन् ते कशासाठी हक्कभंग आणत आहेत, हेदेखील जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिले.
महापालिकेच्या अधिकारी ऐकत नसल्याचा आरोप करत अशा अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचा इशारा आमदार क्षीरसागर यांनी मागील आठवड्यात दिला होता. यावर आमदार पाटील यांनी बोचरी टीका केली.
पाटील म्हणाले, क्षीरसागर यांचे काहीतरी एक-दोन कामे राहिली असतील म्हणून ते अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणतो म्हणत असतील. शहरातील दोन्ही आमदारांनी शंभर कोटी रुपये रस्त्यांची कामाची सीओपीकडून तपासणी करून १५ दिवसांत अहवाल घ्यावा. शंभर कोटींचे रस्ते गेले कुठे याची चाैकशी करावी. नुसत्या बोलण्याने हक्कभंग देतो म्हणण्याला अर्थ नाही.
कोणालाही क्लीनचीट नको
अग्निशमन विभागाच्या इमारतीच्या कामाचे टेंडर कोणाच्या दबावाखाली देण्यात आले. याचे सत्य जनतेसमोर आले पाहिजे. हे काम कोणाला दिले, किती टक्के कमी दराने दिले याची चौकशी होणार का? इतर लोकांना बळी देऊन चालणार नाही, प्रशासकांनी या दुर्घटनेची जबाबदारी स्विकारली पाहिजे. या दुर्घटनेत कोणालाही क्लीनचीट देऊ नये, असेही ते म्हणाले.
तुम्ही एक कलर दिला, तर मी सात कलर देणार
थेट पाइपलाइनच्या संबंधित ज्यांना शहरात टाक्या उभा करण्याचे कॉंट्रॅक्ट दिले, त्यांनी ते काम केलेले नाही. त्या बदल्यात त्यांना २३ कोटींचा दंड लावला आहे. ज्यांना दंड लावला ते कॉंट्रॅक्टर खाडे आहेत. त्यांना हा दंड महाराष्ट्र सरकारने माफ केला आहे का? दंड लावला असेल, तर ते पैसे वसूल झाले का?, असा सवाल करत विनाकारण तुम्ही याला राजकीय कलर द्यायला जाल, तर तुम्ही एक कलर दिला, तर मी सात कलर देणार, असा इशाराही पाटील यांनी दिला.
शाहू छत्रपती यांनाही फसवताय
केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामाचा नव्याने आराखडा बनवला होता. त्यामध्ये चुका झाल्याचे निदर्शनास आले. खासदार शाहू छत्रपती यांनीही नाट्यगृहाच्या बाबतीत काही सूचना केल्या होत्या. मात्र, त्यांना देखील फसवण्यात आले, असा आरोपही सतेज पाटील यांनी केला.