Kolhapur-Local Body Election: जयसिंगपूरमध्ये काँग्रेस, स्वाभिमानीला भाजपचे बळ; अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:26 IST2025-11-21T15:22:46+5:302025-11-21T15:26:58+5:30
माघारीचा आज शेवटचा दिवस

Kolhapur-Local Body Election: जयसिंगपूरमध्ये काँग्रेस, स्वाभिमानीला भाजपचे बळ; अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता
कोल्हापूर : माघारीसाठी अवघे काही तास उरले असताना चित्रविचित्र आघाड्या आकाराला येताना दिसत आहेत. जयसिंगपूरमध्ये तर काँग्रेससोबत भाजपने युतीचा निर्णय घेतला असून, कागलमध्ये शिंदेसेनेसोबत उद्धवसेना आणि काँग्रेसलाही घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. तर मुरगुडमधील अनेक इच्छुक उमेदवारांनी मोबाइल बंद ठेवल्याने नेत्यांची कोंडी झाली आहे.
जयसिंगपूरमध्ये आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही आपल्या सोबत घेतल्याने भाजपच तोंडघशी पडल्याचे चित्र निर्माण झाले. म्हणून या ठिकाणी गणपतराव पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत भाजपने जाण्याचा निर्णय घेतला असून या दोघांसमवेत गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे यांनीही पत्रकार परिषदेत गुरुवारी सहभाग घेतला.
कागलमध्ये उद्धवसेनेनेही आपले उमेदवार सुरक्षितस्थळी हलवले असून काँग्रेसला सोबत घेऊन आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पेठवडगाव येथे प्रविता सालपे विरुद्ध विद्याताई पोळ लढत निश्चित झाली आहे.
मुरगुडमध्ये इच्छुक आणि पात्र ९० उमेदवारांपैकी एकानेही गुरुवारी माघार घेतली नाही. त्यातील अनेक जण ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यामुळे नेत्यांचे धाबे दणाणले आहे.
पन्हाळ्यावर जनसुराज्यचा गुलाल
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक ३/अ मधून इतर मागास गटातून रामानंद गोसावी बिनविरोध निवडून आले आहेत. याआधीही जनसुराज्यचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला असून आमदार विनय कोरे माघारीपर्यंत बिनविरोधची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आज नाट्यपूर्ण घडामोडी घडणार
माघारीच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अडचणीत आणणाऱ्या प्रकरणांपासून ते आर्थिक प्रलोभनापर्यंत, पुढच्या राजकीय आश्वासनापासून अन्य संस्थांमध्ये संधी देण्यापर्यंत अनेक आश्वासने देण्यात येत असून, यासाठीची नेत्यांची यंत्रणा रात्री उशिरापर्यंत कार्यरत होती.