Kolhapur: सीपीआर घोटाळयाच्या चौकशीसाठी समिती दाखल, शेंडा पार्कात कागदपत्रांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 19:08 IST2025-06-27T19:08:03+5:302025-06-27T19:08:50+5:30

साखळीतील अधिकारी, कर्मचारी सुटता कामा नयेत

Committee formed to investigate CPR scam Kolhapur, documents inspected at Shenda Park | Kolhapur: सीपीआर घोटाळयाच्या चौकशीसाठी समिती दाखल, शेंडा पार्कात कागदपत्रांची तपासणी

Kolhapur: सीपीआर घोटाळयाच्या चौकशीसाठी समिती दाखल, शेंडा पार्कात कागदपत्रांची तपासणी

समीर देशपांडे

कोल्हापूर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयाची खोट्या कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून सव्वा चार कोटींचे टेंडर मिळवलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती कोल्हापुरात दाखल झाली असून गुरूवारी रात्री उशिरापर्यंत शेंडा पार्क येथे या प्रकरणातील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत होती.

ठेकेदार मयूर लिंबेकर याने मुलुंड येथील कामगार आरोग्य रूग्णालयाचे बोगस दरकरारपत्र दाखल करून याआधी ४ कोटी ६७ लाख रूपयांचे सर्जिकल साहित्य पुरवठा केले होते. या प्रकरणी त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो दोन महिने फरारी आहे. याच प्रकरणाचा तपास करत असताना आता त्याने मुलुंड आणि वरळी कामगार रूग्णालयाची खोटी दरपत्रके सादर करून ४ कोटी २८ लाख रूपयांचे सर्जिकल साहित्य वितरित करण्याचे आणखी एक टेंडर मिळविले होते. त्यानुसार या दोन्ही आदेशांनुसार साहित्य वितरित करून बिलेही अदा करण्यात आली आहेत.

पहिल्याप्रमाणेच दुसऱ्या प्रकरणामध्येही बोगस दरकरारपत्रे सादर केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवार दि. २५ जूनला प्रकाशित केले होते. त्याची तातडीने दखल घेत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी चौकशी समितीची स्थापना केली. सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली असून याच वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी मनोज दाभाडे हे या समितीचे सदस्य सचिव असून औषध निर्माता कमलेश निरंजन हे सदस्य आहेत.

हे तिघेही गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता शेंडा पार्क येथे आले. त्या ठिकाणी त्यांनी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी चौकशीच्या कामाला सुरूवात केली आहे. या प्रकरणातील सर्व फाईल्स घेऊन त्यांनी सीपीआरचेे प्रशासकीय अधिकारी अजय गुजर यांना शेंडा पार्क येथे बोलावून घेतले. एका स्वतंत्र दालनामध्ये बसून या समितीने कागदपत्रांची छाननी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली हाेती.

साखळीतील अधिकारी, कर्मचारी सुटता कामा नयेत

याआधीच्या पावणे पाच कोटींच्या प्रकरणात फक्त लिंबेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल करून वैद्यकीय शिक्षण विभागाने हात झटकले आहेत तसे न करता यामध्ये ज्याने फाईल तयार केलीे त्या लिपिकापासून शेवटची सही ज्याची होती त्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. अन्यथा एकट्या लिंबेकरला जबाबदार धरून ही मधली भ्रष्ट साखळी नामानिराळी राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Committee formed to investigate CPR scam Kolhapur, documents inspected at Shenda Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.