Kolhapur: सीपीआरमधील काही डॉक्टर, खासगी लॅब चालकांतील मिलीभगत उघड; १५ जणांचे १४ हजारांवर रुपये परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:17 IST2025-12-03T12:16:48+5:302025-12-03T12:17:46+5:30
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा दणका

Kolhapur: सीपीआरमधील काही डॉक्टर, खासगी लॅब चालकांतील मिलीभगत उघड; १५ जणांचे १४ हजारांवर रुपये परत
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : येथील सीपीआरमध्ये काही डॉक्टर आणि खासगी रक्ततपासणी लॅबचालकांमध्ये नातेवाइकांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळण्यासाठीची मिलीभगत असल्याचे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने दोन दिवसांपूर्वी उघड केले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रूपेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठोस पुराव्यासह प्रकरण उघडकीस आणल्यानंतर मंगळवारी लॅबचालकांनी वसूल केलेले १४ हजार ४०० रुपये १५ नातेवाइकांना परत मिळाले.
सीपीआरच्या आवारात बंदी असतानाही खासगी लॅबवाले नातेवाइकांच्या खिशावर डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे. म्हणून डल्ला मारलेल्या रकमेतील ५० टक्के कमिशन डॉक्टर घेतात, त्यांच्यावर कारवाई करावी, ही मागणी आता पाटील यांनी लावून धरली आहे.
कोल्हाूपर, सांगली, सातारा जिल्हा, कोकण आणि सीमाभागात सीपीआरची ओळख थोरला दवाखाना म्हणून आहे. या भागातील गरीब, सर्वसामान्य रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होतात. अपघातातील जखमी, गंभीर आजारीसह गर्भवतीही येथे येतात. अनेक डॉक्टर चांगली सेवा देतात. म्हणून गरीब रुग्णांना सीपीआर आधार वाटतो. पण काही डॉक्टारांना गरीब रुग्णांच्या असाह्यतेचा फायदा घेऊन वरकमाई करण्याची चटक लागल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. वरकमाईसाठी सर्वांत ताजा पैसा रक्ततपासणीतून ते कमवत असल्याचे पुढे आले आहे.
केवळ प्रसूती विभागात एका शिप्टमध्ये खासगी रक्ततपासणीसाठी पन्नास हजार रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले. एका शिप्टमध्ये पन्नास हजार, तर तीन शिप्टमध्ये आणि सर्व विभागांत नातेवाइकांकडून किती पैसे बेकायदेशीरपणे उकळले जातात, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधताना चोवीस तासात चार ते पाच लाख रुपये केवळ खासगी रक्त लॅब चालकाकडून रक्ततपासणी आणि रक्त विक्रीच्या नावाखाली घेतले जातात, असे संभाजी ब्रिगेडचे पाटील यांचे म्हणणे आहे. या भ्रष्ट यंत्रणेला धडा शिकवण्यासाठी ब्रिगेडने नातेवाइकांकडून घेतलेले पैसे लॅबचालकास बोलावून परत देण्यास लावले.
पैसे परत... गुन्हा कबूल.... आता कारवाईकडे लक्ष..
खासगी लॅबचालक सीपीआरमध्ये येऊन नातेवाइकांकडून घेतलेले १४ हजारांवर रुपये परत केल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे गुन्ह्याची कबुली दिली आहे. यातील रॅकेटमधील दोषींवर आता सीपीआर प्रशासन काय कारवाई करणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
आश्वासन दिले...पण..
लॅब चालकाकडून पैसे वसुलीची पर्दाफाश बिग्रेडनी केल्यानंतर सीपीआरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नातेवाइकांना पैसे परत देण्याचा आदेश देऊ, असे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करण्यास खालची यंत्रणा टाळाटाळ करीत होती. ही बाब लक्षात आल्याने ब्रिगेडचे रूपेश पाटील यांनी स्वत: पुढाकार घेऊन पैसे घेतलेल्या प्रत्येक नातेवाइकास सीपीआर आवारात बोलवून लॅबचालकास पैसे देण्यास भाग पाडले.