Kolhapur: इचलकरंजीत उमेदवाराचे स्टेट्स ठेवल्याच्या कारणावरून हाणामारी, २१ जणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:15 IST2026-01-20T15:14:59+5:302026-01-20T15:15:23+5:30
या घटनेत दोन चारचाकी आणि एका मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली

संग्रहित छाया
इचलकरंजी : येथील गणेशनगरमध्ये चांगदेव पाटील परिसरात दोन गटांत सशस्त्र हाणामारी झाली. यामध्ये एकजण जखमी झाला असून, दोन्ही गटांतील २१ जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत दोन चारचाकी आणि एका मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली आहे. निवडणूक निकालानंतर समाजमाध्यमांवर ठेवलेला स्टेट्स आणि विरोधकांसोबत का फिरतोस, या कारणावरून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत नितीन बापू क्षीरसागर (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीत रविवारी रात्री राजू चव्हाण, विजय चव्हाण, विनोद चव्हाण, स्वप्निल चव्हाण, संजय चौधरी (सर्व रा. गणेशनगर) यांच्यासह अनोळखी १० ते १५ जणांनी क्षीरसागर यांना तुझ्या मुलाला मस्ती आली आहे, विरोधकांसोबत फिरत होता, असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यावेळी वाद सोडविण्यासाठी आलेल्या उमेश बिराजदार, सतीश सुतार, संजय कदम, विजय भोरे, राकेश बाटुंगे, उषा क्षीरसागर, संगीता सुतार यांनाही शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे.
विनोद शंकर चव्हाण (४५, रा. डेक्कन चौक, गणेशनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत राजू चव्हाण हे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवार होते. त्यामुळे त्यांचे नातेवाइक महादेव होळसंबे यांनी त्यांचा सोशल मीडियावर स्टेट्स ठेवला होता. त्या रागातून बऱ्या क्षीरसागर याने होळसंबे यांना फोन करून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी राजू चव्हाण, महादेव होळसंबे, दत्ता पवार, आदी चांगदेव पाटील चौकात गेले होते.
तेथे नितीन क्षीरगार, प्रेम क्षीरसागर, बऱ्या क्षीरसागर, ऋतिक सुतार, सतीश सुतार, राकेश बाटुंगे (सर्व रा. चांगदेव पाटील चौक) यांनी चव्हाण यांच्यासह सर्वांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच धमकी देत काठीने व दगडाने चारचाकी तोडफोड केली. त्यावेळी नितीन क्षीरसागर याने खुरप्याने हल्ला करून विनोद चव्हाण याला जखमी केले असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.