Kolhapur: जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोर फिल्मी स्टाईल राडा; एकमेकांना भिडले, उचलून आपटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:40 IST2025-12-27T11:40:08+5:302025-12-27T11:40:26+5:30
नऊजणांवर गुन्हा, पोलिसांचा धाक संपला का?

Kolhapur: जयसिंगपूर पोलिस ठाण्यासमोर फिल्मी स्टाईल राडा; एकमेकांना भिडले, उचलून आपटले
जयसिंगपूर : जयसिंगपूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांनी पोलिस ठाण्याबाहेबरच एकमेकांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली. गावात जाऊन वाद मिटवतो, असे सांगून बाहेर पडलेल्या या दोन्ही गटांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अक्षरश: उचलून जमिनीवर आपटले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
उदगाव (ता. शिरोळ) येथील माहेश्वरी राजेंद्र पाटील व श्रीवर्धन वरेकर हे एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी सकाळी जयसिंगपूर पोलिस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी आमच्या गावातील वाद आहे, आम्ही गावात जाऊन बैठक घेतो, असे सांगून ते पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. प्रवेशद्वाराबाहेर येताच त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकमेकांना उचलून आपटत ‘फिल्मी स्टाईल’ने सुरू झालेल्या या हाणामारीमुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली. अचानक झालेल्या हाणामारीमुळे परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद थांबविण्यात आला. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. पोलिस ठाण्यासमोरच हाणामारीची घटना घडल्याने पोलिस कॉन्स्टेबल फारूक जमादार यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर राजेंद्र बंडू पाटील (४२), माहेश्वरी राजेंद्र पाटील (३५), युवराज राजेंद्र पाटील (२०), गंधराज राजेंद्र पाटील (१९), मंगल बंडू पाटील (४०), श्रीवर्धन गिरीश वरेकर (२६), शरद पांडुरंग लुगडे (४२), शिरीष तुकाराम वरेकर (६०) व हेमलता वरेकर (सर्व रा.माळवाडी, उदगाव) अशी संशयित आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
पोलिसांचा धाक संपला का?
पोलिस ठाण्यासमोरच लोक भिडतात, यावरून कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांच्या समोरच दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांना न जुमानता मारहाण झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पोलिसांचा दरारा संपला की काय, अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.