कोल्हापुरातील रंकाळ्यावरच तिरडी बांधून मारली बोंब, नेमकं काय झालं... वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 18:36 IST2025-11-10T18:34:00+5:302025-11-10T18:36:21+5:30
‘मला येथून कायमचा उचला’

कोल्हापुरातील रंकाळ्यावरच तिरडी बांधून मारली बोंब, नेमकं काय झालं... वाचा
कोल्हापूर : रंकाळा टॉवरशेजारील महादेव मंदिर परिसरात रोज पडणारा कचरा उचलला जात नाही म्हणून रविवारी सायंकाळी स्थानिक नागरिकांनी या प्रश्नाकडे महानगरपालिका आरोग्य विभागाचे लक्ष वेधण्याकरिता चक्क तिरडीवर कचरा ठेवून बोंब मारली. या अनपेक्षित आणि अभिनव आंदोलनाकडे फिरायला येणारे नागरिक उत्सुकतेने पाहत राहिले.
रंकाळा तलावाच्या परिसरात शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटक तसेच शहरवासीय मोठ्या संख्येने फिरायला येत असतात. त्यामुळे लहान मुलांसह आलेले पर्यटक, शहरवासीय खाद्यपदार्थांचे रॅपर्स, कागद, प्लास्टिक कचरा तेथेच उघड्यावर टाकून जातात. परंतु हा कचरा नियमितपणे उचलण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाकडून होत नाही. त्यामुळे टॉवरजवळ कचरा तसाच साचून राहतो. शेजारीच महादेव मंदिर आहे.
स्थानिक नागरिकांनी या कचरा साचून राहणाऱ्या घटनेकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच दैनंदिन कचरा उठाव केला जात नसल्याचे निषेध करण्यासाठी रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमाराला अभिनव आंदोलन केले. त्याठिकाणी मृतदेहासाठी जशी तिरडी बांधली जाते तशी तिरडी बांधून त्यावर तेथील कचरा ठेवण्यात आला होता. त्यावर गुलाल, फुले वाहण्यात आली होती. त्यावर ‘मला येथून कायमचा उचला’ अशी अक्षरे असलेला फलक लावण्यात आला होता. आंदोलकांनी तेथे बोंबही मारली.
रविवारी सायंकाळी रंकाळ्यावर बरीच गर्दी झाली होती. त्याचवेळी हे अभिनव आंदोलन झाल्यामुळे अनेक नागरिक थांबून हे आंदोलन पाहत होते. या आंदोलनाने तरी प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा आंदोलन करणाऱ्यांपैकी ‘शेकाप’चे कार्यकर्ते सुभाष सावंत यांनी व्यक्त केली.