कोल्हापुरात येताच सरन्यायाधीश भूषण गवई यांचे शाहू समाधीस्थळी अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 19:32 IST2025-08-16T19:30:34+5:302025-08-16T19:32:24+5:30

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज, शनिवारी कोल्हापूर विमानतळावर ६ वाजता आगमन झाले. कोल्हापूर सर्किट बेंचचे ...

Chief Justice Bhushan Gavai pays tribute at Shahu Samadhi Sthal upon his arrival in Kolhapur for the inauguration of the Circuit Bench | कोल्हापुरात येताच सरन्यायाधीश भूषण गवई यांचे शाहू समाधीस्थळी अभिवादन

कोल्हापुरात येताच सरन्यायाधीश भूषण गवई यांचे शाहू समाधीस्थळी अभिवादन

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज, शनिवारी कोल्हापूर विमानतळावर ६ वाजता आगमन झाले. कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्या, रविवारी त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. विमानतळावर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळावरील स्वागतानंतर सरन्यायाधीशांनी थेट राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी जात अभिवादन केले. 

उद्या, रविवारी दुपारी तीन वाजता सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल (सीपीआर) समोरील ऐतिहासिक इमारतीमध्ये सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे. तर उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा मेरी वेदर मैदानावर होणार आहे. यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील नागरिकांचा न्यायदानाच्या प्रक्रियेतील वेळ, पैसा, श्रम यामुळे कमी होणार आहे.

आज कोल्हापूर विमानतळावर सरन्यायाधीशांचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. सरन्यायाधीशांनी व्यक्तिगतरीत्या सर्वांशी संवाद करत स्वागताचा स्वीकार केला. कोल्हापूर सर्किट बेंचसाठी मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्ती केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे,न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विधीक्षेत्रातील अन्य मान्यवरही उपस्थित होते. 

यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्याचे ग्राहक तक्रार निवारण आयुक्तालयाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, आमदार सतेज पाटील, जयंत आसगावकर, विनय कोरे, अमल महाडिक, अशोकराव माने, राहुल आवाडे, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनीही त्यांचे स्वागत केले.

Web Title: Chief Justice Bhushan Gavai pays tribute at Shahu Samadhi Sthal upon his arrival in Kolhapur for the inauguration of the Circuit Bench

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.