Kolhapur: अंबाबाई दर्शन रांगेच्या व्यवस्थेत बदल केला, दर्शनास वेग आला; कशी आहे व्यवस्था.. जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:54 IST2025-09-23T17:54:05+5:302025-09-23T17:54:46+5:30
व्हीआयपी गळ घालण्याचा त्रास कमी

Kolhapur: अंबाबाई दर्शन रांगेच्या व्यवस्थेत बदल केला, दर्शनास वेग आला; कशी आहे व्यवस्था.. जाणून घ्या
कोल्हापूर : यंदाच्या शारदीय नवरात्रौत्सवात कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरातील दर्शन रांगांची व्यवस्था बदलून देवीचे दर्शन गाभाऱ्याबाहेरील चांदीच्या उंबऱ्याऐवजी पितळी उंबऱ्याबाहेरून वळवण्यात आले आहे. तर, सरस्वती मंदिर येथील गेट बॅरिकेड्स लाऊन बंद केले आहे. त्याऐवजी शनि मंदिराजवळील गेट खुले करून तेथून भाविकांना बाहेर जाण्याचा मार्ग केला आहे. या पूर्ण मार्गावर लाकडी रॅम्प केले असून, या सर्व बदलांमुळे भाविकांना अंबाबाईचे दर्शन वेगाने घडत आहे, तर मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे.
नवरात्रौत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. त्यांना फार वेळ रांगांमध्ये उभे राहावे लागू नये, यासाठी यंदा प्रथमच गाभारा दर्शन रांग बाहेरील पितळी उंबऱ्यापासून वळविण्यात आली आहे. एरवी ही रांग गाभाऱ्याबाहेरील चांदीच्या उंबऱ्यापर्यंत असते. मंदिर प्रवेश करताना साक्षी गणपतीपासून ते महाकाली मंदिर, अंबाबाई गाभाऱ्यासमाेरील पितळी उंबरा ते शनि मंदिर या पूर्ण दर्शन मार्गेवर लाकडी रॅम्प लावल्याने मंदिरात खाली-वर असलेल्या दगडी फरश्यांचा भाविकांना न त्रास होता पुढे जाणे सोयीस्कर झाले. शनि मंदिराजवळील सर्व लोखंडी दरवाजे काढून टाकून येथून बाहेर पडायचा मार्ग मोकळा केला आहे. अगदी व्हीआयपी आले, तर त्यांना येथून सोडले जात होते.
व्हीआयपी गळ घालण्याचा त्रास कमी
अंबाबाईचे दर्शन घेतलेले भाविक सरस्वती मंदिरापासून बाहेर पडायचे. इथेच अनेक भाविक थेट व्हीआयपी दर्शनासाठी गळ घालत गर्दी करायचे. त्यामुळे मोठा गोंधळ व्हायचा. ते टाळण्यासाठी सरस्वती मंदिराजवळील गेट बॅरिकेड्स लाऊन बंद केले आहे.
गरुड मंडपात पहिला अभिषेक..
अंबाबाई मंदिर परिसरात नव्या दिमाखात साकारत असलेल्या गरुड मंडपात सोमवारपासून धार्मिक विधींना प्रारंभ झाला. ही वास्तू धोकादायक झाल्याने गेल्या तीन वर्षांपासून बंद होती. यंदा मात्र पुरातत्व विभागाकडून नव्याने गरुड मंडप साकारले जात असून, खास नवरात्राेत्सवासाठी वेगाने लाकडी खांब, कमानी उभारण्यात आल्या आहेत. छतासाठी पत्रे मारून खाली मांडव साकारला आहे. या नव्या गरुड मंडपात सोमवारी पहाटेपासून भाविकांकडून अंबाबाईचे अभिषेक सुरू करण्यात आले.