केंद्रीय सहकार विभागाचे लवकरच पुण्यातून कामकाज - मोनिका खन्ना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 16:21 IST2026-01-10T16:21:07+5:302026-01-10T16:21:33+5:30
कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाची सांगता

केंद्रीय सहकार विभागाचे लवकरच पुण्यातून कामकाज - मोनिका खन्ना
कोल्हापूर : केंद्रीय सहकार विभागांतर्गत देशभरातील मल्टीस्टेट संस्थांच्या काही अडचणी समोर आल्या आहेत. यासाठी पुण्यात लवकरच कार्यालय सुरू होत असून, तेथूनच कामकाज होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सहकार विभागाच्या सहनिबंधक मोनिका खन्ना यांनी केले.
फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी, पुणे यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सांगता समारंभ व एकदिवसीय कार्यशाळेचे शुक्रवारी कोल्हापुरात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खन्ना बोलत होत्या. फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे अध्यक्षस्थानी होते.
कोल्हापूर विभागीय सहनिबंधक डॉ. महेश कदम म्हणाले, मल्टीस्टेट म्हणजे स्वायत्तता असे काहीसे समीकरण झाले असून, या संस्थांनी स्वत:हून काही बंधने पाळणे गरजेचे आहे. राज्याचे सहकार आयुक्त यांच्यानंतर मल्टीस्टेट संस्थांसाठी खाली काहीच यंत्रणा नसल्याने संस्थांवर नियंत्रणाच्या मर्यादा येतात.
बेळगाव जिल्हा उपनिबंधक रवींद्र पाटील म्हणाले, राज्यांच्या सहकार कायद्यांची बंधने नकोत म्हणूनच मल्टीस्टेट संस्थांचा घाट घातला जात आहे. कर्नाटक स्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष डॉ. संजय होसमट म्हणाले, कर्नाटकात सहकार विभागाचे काम सर्वच क्षेत्रांत आहे. विशेष म्हणजे, सहकारी रुग्णालये उभी राहिल्याने सामान्य माणसाला आधार मिळत आहे.