Kolhapur: महाविद्यालयीन तरुणीच्या अपघातप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:11 IST2025-07-26T19:10:56+5:302025-07-26T19:11:49+5:30
चालकाला बाल न्यायालयाने १४ दिवसांचा रिमांड मंजूर केला

Kolhapur: महाविद्यालयीन तरुणीच्या अपघातप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी
कोल्हापूर : कुरुकली (ता.करवीर) येथे अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवून महाविद्यालयीन तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी चालकांसह त्याचे चार मित्र (विधीसंघर्षग्रस्त बालके) वडील आणि चुलता असा सहा जणांवर गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी शुक्रवारी वडील सुरेश साताप्पा परीट ( वय ४९) आणि चुलता जितेंद्र सात्ताप्पा परीट (वय ५१, दोघेही रा.राशिवडे ता.राधानगरी) या दोघांना अटक केली. या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. चालकाला बाल न्यायालयाने १४ दिवसांचा रिमांड मंजूर केला.
कुरुकली येथे भोगावती कॉलेज रोडवर रिकवी फाटा येथे बसची वाट पाहत उभ्या असलेल्या महाविद्यालयीन तरुणींच्या घोळक्यात भरधाव मोटार घुसल्याने एक विद्यार्थिनी ठार झाली होती. प्रज्ञा दशरथ कांबळे (वय १७ रा.कौलव) ही तरुणी जागीच ठार झाली होती. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यात अस्मिता अशोक पाटील (वय १८, रा.कौलव), श्रावणी उदय सरनोबत (वय २१ रा.कसबा तारळे), श्रेया बसंत डोंगळे (वय १७ रा.घोटवडे) या तिघी गंभीर जखमी झाल्या होत्या.
अपघातानंतर चालक पसार झाला होता. त्याचा पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यासह वाहनात हुल्लडबाजी करून भरधाव वेगाने वाहन चालविण्यास प्रोत्साहित केल्याप्रकरणी विधीसंघर्ष बालकांवर गुन्हा दाखल केला. अपघातामधील वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दोघांवर गुन्हा
अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी वडिलावर आणि संबंधित वाहन चुलत्याच्या नावावर असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला.