Kolhapur Crime: एएस ट्रेडर्स एजंटची अलिशान कार जप्त, पुण्यातून घेतला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:44 IST2025-04-01T11:44:06+5:302025-04-01T11:44:30+5:30

मालमत्ता लिलाव प्रक्रिया गतिमान

Car seized of Amit Arun Shinde agent of AS Traders company who cheated investors in kolhapur | Kolhapur Crime: एएस ट्रेडर्स एजंटची अलिशान कार जप्त, पुण्यातून घेतला ताबा

Kolhapur Crime: एएस ट्रेडर्स एजंटची अलिशान कार जप्त, पुण्यातून घेतला ताबा

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीचा एजंट अमित अरुण शिंदे (वय ४७, रा. लिशा हॉटेलजवळ, कोल्हापूर) याची सुमारे ६० लाखांची अलिशान कार (एमएच ०९ एफएक्स ०९०९) पोलिसांनी सोमवारी (दि. ३१) पुण्यातून जप्त केली. पत्नीच्या नावे खरेदी केलेली कार त्याने गुन्हे दाखल होताच पुण्यातील एका व्यक्तीस विकली होती. दरम्यान, संचालक आणि एजंट यांच्या जप्त केलेल्या सुमारे १३ कोटींच्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया गतिमान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुंतवणुकीवर कमी कालावधीत मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एएस ट्रेडर्स कंपनीने हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. या गुन्ह्यातील १८ संशयितांना आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून, यांच्या सुमारे १३ कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. अटकेतील एजंट अमित शिंदे याच्या दोन कार पोलिसांनी दीड वर्षांपूर्वी जप्त केल्या आहेत.

एएस ट्रेडर्समधून मिळालेल्या पैशातून त्याने पत्नीच्या नावे ६० लाखांची आलिशान कार खरेदी केली होती. गुन्हे दाखल होताच ती कार त्याने पुण्यातील एका व्यक्तीला विकली होती. संबंधित कार पुण्यातील ॲटोनेशन शोरूममध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुण्यात जाऊन शिंदे याने विकलेली कार जप्त केली. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार विजय काळे, राजू येडगे आणि राजेंद्र वरंडेकर यांनी ही कारवाई केली.

शिंदे न्यायालयीन कोठडीत

अमित शिंदे याला पोलिसांनी १७ ऑगस्ट २०२३ रोजी अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या एकूण तीन कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्याच्यासह अटकेतील इतरांच्या मालमत्तांचा शोध सुरू आहे. तसेच पसार असलेल्या इतर संशयितांचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

१२ जणांच्या २० मालमत्ता

एएस ट्रेडर्सचे संचालक आणि एजंट असलेल्या १२ जणांच्या २० मालमत्ता पोलिसांनी जप्त केल्या आहेत. याचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांचीही नेमणूक झाली आहे. त्यानुसार लिलाव प्रक्रिया गतिमान झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक कळमकर यांनी दिली.

Web Title: Car seized of Amit Arun Shinde agent of AS Traders company who cheated investors in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.