कोल्हापूर जिल्हा परिषदेला ५७ कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुंबईतील बँक खात्यावर पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:44 IST2025-02-26T11:43:43+5:302025-02-26T11:44:13+5:30
मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या खात्याचा बनावट धनादेश, स्टॅम्पचा वापर

कोल्हापूर जिल्हा परिषदेला ५७ कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुंबईतील बँक खात्यावर पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न
कोल्हापूर : मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या बनावट खात्याचा बनावट धनादेश व स्टॅम्प बसवून त्यावर खोटी सही करून जिल्हा परिषदेला तब्बल ५७ कोटी ४ लाख ४० हजार ७८६ रुपयांचा गंडा घालण्याचा डाव उघड झाला आहे. फोकस इंटरनॅशनल, जीसीएसएसपी प्रायव्हेट लिमिटेड आणि ट्रिनिटी इंटरनॅशनल यांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यासाठी अज्ञाताने हा प्रकार केल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे.
जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी कृष्णात पाटील यांनी सोमवारी सायंकाळी शाहुपुरी पोलिसांत यांची तक्रार केली. या प्रकरणात वित्त विभाग आणि बँकेच्या शाखेतील कुणीतरी माहीतगार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या नावे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्हा परिषदेच्या शाखेत खाते आहे. या शाखेत व्यवहारांचे आदान-प्रदान करण्यासाठी तीन खाती आहेत. शासनाकडून विविध योजनांसाठी आलेला निधी जिल्हा परिषद या बँकेच्या शाखेत जमा करते. या शाखेतूनच विविध योजना, ठेकेदारांची बिले वित्त विभागातर्फे दिली जातात.
वित्त विभागातर्फे धनादेश वटविण्यासाठी दिल्यानंतर बँकेस पत्र दिले जाते. दर दिवसाआड रोखपाल हे बँकेत जाऊन झालेल्या व्यवहारांचे खाते उतारे तपासून माहिती करून घेतात, अशी माहिती करून घेताना या तीन खात्यांवर जिल्हा परिषदेची फसवणूक करण्यासाठी पैसे वर्ग केल्याचा संशय आला.
दरम्यान, शुक्रवारी वित्त विभागाकडील रोखपाल विशाल चंद्रकांत चौगुले, सुफियान शहाबुद्दीन जमादार हे जिल्हा बँक जिल्हा परिषद शाखेतून खाते उतारा आणण्यासाठी गेले. त्यावेळी बँकेतील या खात्यातून मंगळवारी १८ कोटी ४ लाख ३० हजार ६४१ रुपयांचा धनादेश फोकस इंटरनॅशनल या नावाने वटल्याचे निदर्शनास आले.
हा धनादेश नवी मुंबईतील सानपाडा येथील आयडीएफसी फर्स्ट येथे जमा झाल्याचे दिसून आले. बुधवारी हा धनादेश खर्चीही पडला होता. हे तत्काळ निदर्शनास आल्याने शुक्रवारी वित्त विभागाच्या प्रशासनाने ते खाते गोठवण्यास सांगितले. पत्रव्यवहार सुरू आहे. पण, परस्पर पाठवलेली रक्कम अजून जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा झालेली नाही. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने बँकेच्या शाखेत जाऊन सखोल चौकशी केली. त्यावेळी आणखी दोन धनादेश परस्पर वटविण्यात आल्याचे उघड झाले.
मंगळवारी दिलेला १९ कोटी ९८ लाख ८ हजार ६०३ इतक्या रकमेचा धनादेश जीसीएसएसपी प्रायव्हेट लिमिटेड या नावे नवी मुंबईतील सानपाडा येथील आयसीआयसीआय बँकेत जमा केला. हा धनादेश वटविण्याच्या प्रक्रियेत असतानाच प्रशासनाने पत्रव्यवहार केल्याने जिल्हा परिषदेच्या खात्यावर पैसे परत जमा झाले.
वित्त विभागाच्या सतर्कतेमुळे जिल्हा परिषदेची फसवणूक टळली आहे. अज्ञाताकडून बनावट धनादेशाद्वारे जिल्हा परिषदेला गंडा घालण्याच्या प्रयत्नाला आळा बसला. पोलिसांकडून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होण्यासाठी फिर्याद दिली आहे. -अतुल आकुर्डे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर