अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, कोल्हापुरातील स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:10 IST2025-06-04T12:10:01+5:302025-06-04T12:10:24+5:30

पाच जणांची टोळी

Businessman demanded Rs 3 crore ransom threatening to have an immoral relationship Crime against five people including Sneha Narkar from Kolhapur | अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, कोल्हापुरातील स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

अनैतिक संबंधाची धमकी; व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटी खंडणी, कोल्हापुरातील स्नेहा नारकरसह पाच जणांवर गुन्हा

कोल्हापूर : व्यवसायासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने लगट वाढवून अनैतिक संबंधाचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या टोळीने तारदाळ येथील व्यावसायिकाकडे ३ कोटींची खंडणी मागितली. याप्रकरणी स्नेहा संजय नारकर (वय ३५, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) हिच्यासह पाच जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्यावसायिक आनंद श्रीनिवास मर्दा (वय ४७, रा. संगमनगर, तारदाळ, ता. हातकणंगले) यांनी सोमवारी (दि. २) रात्री उशिरा फिर्याद दिली.

नारकर हिच्यासह शांताबाई वाळकुंडे (रा. यशवंतनगर, इचलकरंजी), संतोष पाटील (रा. चिपरी, ता. शिरोळ), शेखर गाडेकर (रा. जयसिंगपूर) आणि रामचंद्र (नारकर हिच्या कारवरील चालक) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मर्दा यांची तारदाळ येथे सायझर्स कंपनी आहे. स्नेहा नारकर हिने प्रवासात ओळख वाढवून आपण कोल्हापुरातील एका बँकेत क्रेडिट मॅनेजर पदावर काम करीत असल्याचे सांगितले.

व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासह बँकांकडे तारण असलेले सोने लिलावात कमी किमतीत मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिने संपर्क वाढवला. त्यानंतर काही दिवसांत तिने मर्दा यांच्याकडे ३ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

पैसे न दिल्यास दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून त्रास देण्याची धमकी तिने दिली. हा प्रकार १२ ते २५ मे २०२५ या काळात घडला. नारकर हिला दुसऱ्या गुन्ह्यात लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली असून, तिचा ताबा घेतला जाईल, तसेच इतर आरोपींचाही शोध सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांनी दिली.

पाच जणांची टोळी

या गुन्ह्यात नारकर हिच्यासह पाच जणांचा सहभाग आहे. त्यांना अटक करून गुन्ह्यातील सहभाग तपासला जाणार आहे. या टोळीने आणखी काही जणांना गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी फिर्याद द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नारकर हिच्यावर दुसरा गुन्हा

जयसिंगपूर येथील नितीन जंगम यांना दीड कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४३ लाख ७४ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी नारकर हिच्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात तिला अटक झाली आहे. तिच्यावर राज्यात इतर ठिकाणी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Businessman demanded Rs 3 crore ransom threatening to have an immoral relationship Crime against five people including Sneha Narkar from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.