Kolhapur Crime News: नशेत घरच्यांना त्रास देणाऱ्या भावाचा डोके ठेचून निर्घृण खून, स्वत:च पोलिसांनी कळवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:03 IST2026-03-09T12:02:44+5:302026-03-09T12:03:34+5:30

हल्लेखोर ताब्यात, घटनेने खळबळ

Brutal murder of brother who was disturbing his family in a drunken state by crushing his head in kolhapur | Kolhapur Crime News: नशेत घरच्यांना त्रास देणाऱ्या भावाचा डोके ठेचून निर्घृण खून, स्वत:च पोलिसांनी कळवले

Kolhapur Crime News: नशेत घरच्यांना त्रास देणाऱ्या भावाचा डोके ठेचून निर्घृण खून, स्वत:च पोलिसांनी कळवले

कोल्हापूर : दारू आणि गांजाच्या नशेत घरात सतत इतरांशी वाद घालणारा मोठा भाऊ हर्ष विलास पांढरबळे (वय २३, रा. चौथी गल्ली, राजारामपुरी) याचा धाकटा भाऊ यश (१९) याने स्टीलच्या बाटलीने डोके ठेचून खून केला. ही घटना रविवारी (दि. ८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पांढरबळे याच्या घरात घडली. हल्लेखोराला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरात रंगपंचमीचा उत्साह सुरू असताना घडलेल्या निर्घृण खुनाने खळबळ उडाली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, राजारामपुरी येथील चौथ्या गल्लीत विलास पांढरबळे हे पत्नीसह मोठा मुलगा हर्ष, त्याची पत्नी, त्याच्या दोन मुली, धाकटा मुलगा यश यांच्यासह छोट्याशा दुमजली घरात राहतात. त्यांचा दोन नंबरचा मुलगा गोकुळ शिरगाव येथे राहतो. हे कुटुंब मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करते. मोठा मुलगा हर्ष याला दारू आणि गांजाचे व्यसन होते. नशेत तो घरात सगळ्यांशी वाद घालत होता. पत्नीला मारहाण करीत होता. या त्रासाला घरातील सगळे कंटाळले होते.

गेल्या चार दिवसांपासून हर्ष आणि यश या दोघांत वाद सुरू होता. रविवारी सायंकाळी हे दोघेच घरात होते. वरच्या मजल्यावरील खोलीत दोघांत झटापट झाली. त्यावेळी यश याने स्टीलच्या बाटलीने आणि स्वयंपाकघरातील परातीने हर्षच्या डोक्यात मारहाण केली. बाटलीने डोके ठेचल्याने हर्ष रक्ताच्या थारोळ्यात पडला. गंभीर दुखापतींमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

हल्लेखोराने स्वत:च पोलिसांना कळवले

मारहाणीनंतर हल्लेखोर यश हा काही काळ हर्षच्या मृतदेहाजवळ बसला होता. त्याचे कपडे आणि शरीर रक्ताने माखले होते. काही वेळाने खाली येऊन त्याने राजारामपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक सतीश होडगर, सहायक पोलिस निरीक्षक भरत साळुंखे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून हल्लेखोर यश याला ताब्यात घेतले. शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.

गर्दी अन् आक्रोश

घटनेची माहिती मिळताच पांढरबळे कुटुंबीय घरी पोहोचले. हर्षचा मृतदेह पाहून त्यांनी आक्रोश केला. एका मुलाचा खून झाला, तर या गुन्ह्यात दुसरा मुलगा पोलिसांच्या कोठडीत गेल्याने आई-वडिलांना धक्का बसला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पांढरबळे यांच्या घरासमोर मोठी गर्दी केली होती.

गुन्ह्यातील वस्तू जप्त

घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्ह्यात वापरलेली स्टीलची बाटली, परात, रक्ताने माखलेली बेडशीट, रक्ताचे नमुने पोलिसांनी जप्त केले. फॉरेन्सिक व्हॅनही घटनास्थळी पोहोचली होती. राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Web Title : कोल्हापुर: नशे में भाई की हत्या, छोटे भाई ने पुलिस को बताया।

Web Summary : कोल्हापुर में, 23 वर्षीय हर्ष की उसके 19 वर्षीय भाई यश ने हत्या कर दी, क्योंकि हर्ष की शराब और गांजे की लत से लगातार झगड़े होते थे। यश ने स्टील की बोतल से हर्ष पर जानलेवा हमला किया। फिर यश ने पुलिस को घटना की सूचना दी, जिसके बाद पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया।

Web Title : Kolhapur: Intoxicated man killed by brother; police informed.

Web Summary : In Kolhapur, a 23-year-old man, Harsh, was murdered by his 19-year-old brother, Yash, due to constant arguments fueled by Harsh's alcohol and marijuana addiction. Yash used a steel bottle to fatally wound Harsh. Yash then reported the incident to the police, who arrived and arrested him.