Kolhapur: कुटुंबाला मारहाण करणाऱ्या भावाचा सुपारी देऊन काढला काटा, निमशिरगावच्या खुनाचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:25 IST2025-05-29T13:25:15+5:302025-05-29T13:25:32+5:30

सहाजणांना अटक

Brother who beat up family killed by giving betel nut Nimshirgaon murder case solved | Kolhapur: कुटुंबाला मारहाण करणाऱ्या भावाचा सुपारी देऊन काढला काटा, निमशिरगावच्या खुनाचा उलगडा

Kolhapur: कुटुंबाला मारहाण करणाऱ्या भावाचा सुपारी देऊन काढला काटा, निमशिरगावच्या खुनाचा उलगडा

जयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील (वय ३५, रा. निमशिरगाव) याच्या खुनाचा उलगडा झाला आहे. सहा लाखांची सुपारी देऊन सख्ख्या भावानेच लहान भावाचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील (वय ३७, रा. निमशिरगाव), मोहन प्रकाश पाटील (वय ३३, रा. निमशिरगाव), राकेश उर्फ विनोद वसंत थोरात (वय २३, रा. कुंभोज रोड, दानोळी), किरण आमाण्णा थोरात (वय २७, रा. धनगरवाडा दानोळी), सागर भीमराव लोहार (वय ३०) व अमर रामदास वडर (वय ३३, रा. दिलदार चौक, भादोले, ता. हातकणंगले) या सहाजणांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिसकोठडी सुनावली आहे.

मंगळवारी (दि. २७) सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना तमदलगे गावच्या हद्दीतील डोंगरावर अविनाश पाटील याचा मृतदेह दिसून आला होता. मृतदेहालगतच मोटारसायकलही उभी होती. तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून जयसिंगपूर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पाच पथकांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपासयंत्रणा गतिमान केली होती. मृत अविनाश याचा भाऊ जिनगोंडा पाटील याच्यावर संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.

अविनाश हा दररोज मद्य प्राशन भांडण करून त्याच्या मुलांना, पत्नीला मारहाण करीत होता. त्याच्या या कृत्याला कंटाळून भाऊ जिनगोंडा पाटील याने त्याचा मित्र मोहन पाटील याला भावाचा काटा काढायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर मोहन पाटील याने राकेश थोरात यास बोलावून घेतल्यानंतर त्याचा काटा काढण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली. ठार मारण्यापूर्वी तीन लाख रुपये व मारल्यानंतर तीन लाख देण्याचे ठरले.

अविनाश हा घरातून किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कोठे जातो, यावर पाळत ठेवण्यास संशयितांनी सुरुवात केली होती. सोमवारी (दि. २६) रात्री अविनाशला तमदलगे गावच्या हद्दीत असलेल्या बसवान खिंडीत डोंगरात निर्जनस्थळी आरोपींना नेले. त्याठिकाणी डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. पोलिसांनी तपासयंत्रणा राबवून आरोपींना अटक केली.

..अन्य कारणांचा शोध

अविनाश हा मद्यप्राशन करून पत्नी व मुलांना मारहाण करीत असल्याच्या कारणावरून भाऊ जिनगोंडा याने त्याच्या खुनाची सुपारी दिली होती. सहा लाख रुपयांना हा व्यवहार ठरला होता. पोलिस तपासात प्रथमदर्शनी हे कारण पुढे आले असले तरी आणखी कारणांचाही पोलिस शोध घेत आहेत.

दगडाने ठेचून खून

आरोपींनी अविनाशच्या खुनाची सुपारी घेतल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवून सोमवारी रात्री तमदलगे येथील डोंगरावर निर्जनस्थळी त्याला नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्या डोक्यात दगड घालून संशयितांनी त्याचा खून केला.

Web Title: Brother who beat up family killed by giving betel nut Nimshirgaon murder case solved