Kolhapur: फसवणुकीचा गुन्हा दाखल करत नाही, अधिकाऱ्याच्या नावे सात लाखांची लाच मागितली; हवालदार, कॉन्स्टेबलवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 11:43 IST2026-03-10T11:42:51+5:302026-03-10T11:43:35+5:30
अटकेची चाहूल लागताच दोघेही पळाले

Kolhapur: फसवणुकीचा गुन्हा दाखल करत नाही, अधिकाऱ्याच्या नावे सात लाखांची लाच मागितली; हवालदार, कॉन्स्टेबलवर गुन्हा
कोल्हापूर : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी प्रभारी अधिकाऱ्याच्या नावे सात लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यातील हवालदार आणि कॉन्स्टेबलवर सोमवारी (दि. ९) त्यांच्याच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. हवालदार नीतेश मारुती कांबळे (रा. दऱ्याचे वडगाव, ता. करवीर) आणि कॉन्स्टेबल एजाज महंमद शेख (रा. करनूर, ता. कागल) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. अटकेची चाहूल लागताच दोघे पळाले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात १६ जानेवारी २०२६ रोजी फसवणुकीचा तक्रार अर्ज आला होता. हवालदार नीतेश कांबळे याने त्यातील संशयित आरोपीला पोलिस ठाण्यात बोलवून चौकशी केली. त्यानंतर कॉन्स्टेबल एजाज शेख याने संशयितास बोलवून गुन्हा दाखल न करण्यासाठी प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक तबस्सूम मगदूम यांच्या नावे सात लाखांच्या लाचेची मागणी केली.
चार लाखांवर तडजोड होऊन दोन दिवसांत लाचेची रक्कम पोहोच करण्याचे ठरले होते. याबाबत संशयिताने त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. याची पडताळणी करून लाच स्वीकारताना सापळा रचण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र, त्यांनी लाच स्वीकारली नाही.
अखेर लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांवर सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांचे पथक अटकेसाठी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गेले होते. अटकेची चाहूल लागताच कांबळे आणि शेख यांनी पळ काढला. दोघांचा शोध सुरू असून, त्यांच्या घरांची झडती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक पाटील यांनी दिली.
प्रभारी अधिकाऱ्यांच्या सहभागाची चौकशी होणार
गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक तबस्सूम मगदूम यांच्या नावे लाचेची मागणी झाली होती. त्यामुळे त्याचा यात सहभाग आहे काय? याची पडताळणी करण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. सहभागाचे पुरावे मिळाल्यास त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.