Kolhapur Accident: परीक्षा संपताच मामाला फोन केला, आजोळी जाताना वाटेतच काळाने घाला घातला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 17:13 IST2026-03-19T17:10:53+5:302026-03-19T17:13:03+5:30
Kolhapur Accident: बेळगुंदी, साजणी गावांवर शोककळा

Kolhapur Accident: परीक्षा संपताच मामाला फोन केला, आजोळी जाताना वाटेतच काळाने घाला घातला
कोल्हापूर : शाळेला सुट्टी लागताच मामासोबत आजोळी जाताना दुचाकी टेम्पोला धडकून झालेल्या अपघातात अथर्व प्रकाश कानडे (वय १२, रा. बेळगुंदी, ता. गडहिंग्लज) याचा जागीच मृत्यू झाला. कागल एमआयडीसीत मंगळवारी (दि. १७) सायंकाळी झालेल्या अपघाताने नोकरीनिमित्त दुबईत असलेले प्रकाश कानडे यांना धक्का बसला. युद्धस्थितीतही ते १८ तासांत गावात पोहोचले. बुधवारी (दि. १८) दुपारी बेळगुंदीत मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने बेळगुंदीसह आजोळी साजणी (ता. हातकणंगले) गावात शोककळा पसरली.
बेळगुंदी येथील अभियंता प्रकाश कानडे हे गेल्या आठ वर्षांपासून दुबईतील एका कंपनीत नोकरी करतात. इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू होताच गावाकडे त्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली होती. त्यांची पत्नी, मुले, आई, वडील गावाकडे असतात. सहावीत शिकणाऱ्या अथर्वची परीक्षा संपताच त्याने सुट्टीला साजणी येथे आजोळी जाण्यासाठी मामाला फोन करून बोलावून घेतले होते. मंगळवारी तो मामासोबत दुचाकीवरून आजोळी निघाला होता.
कागल पंचतारांकित एमआयडीसीच्या बीएसएनएल चौकात टेम्पोला दुचाकी धडकून अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवर पुढे बसलेला अथर्व उडून टेम्पोच्या चाकाखाली सापडला. गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मामा संदीप विश्वनाथ शेटे (वय ३६, रा. साजणी) आणि दुसरी १४ वर्षीय भाची किरकोळ जखमी झाले.
चुणचुणीत आणि खेळकर मुलगा अपघातात जागीच केल्याने कानडे आणि शेटे कुटुंबियांना जबर धक्का बसला. यातच युद्धस्थितीत अथर्वचे वडील प्रकाश हे दुबईतून भारतात कसे पोहोचणार, याची चिंता सतावत होती. नातेवाईकांनी प्रकाश यांना फोनवरून दु:खद घटना कळवली आणि तातडीने गावाकडे यायला सांगितले. ऐनवेळी तिकीट घेऊनही सुदैवाने विमानामध्ये जागा मिळाली आणि १८ तासांत ते गावात पोहोचले.
वडील पोहोचताच अंत्यसंस्कार
नातेवाईकांनी अथर्वचा मृतदेह शीतगृहात ठेवला होता. वडील गावात पोहोचताच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांसह संपूर्ण गाव या दु:खात बु़डाले. बेळगुंदी आणि साजणी गावात हळहळ व्यक्त होत आहे.