Kolhapur: शाळेत कमी गुण मिळाल्याने पुण्याला गेल्या, ‘त्या’ बेपत्ता दोन्ही मुली अखेर सापडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 18:00 IST2025-11-11T18:00:20+5:302025-11-11T18:00:49+5:30
प्राथमिक चौकशीत निष्पन्न

Kolhapur: शाळेत कमी गुण मिळाल्याने पुण्याला गेल्या, ‘त्या’ बेपत्ता दोन्ही मुली अखेर सापडल्या
इचलकरंजी : शाळेला जातो, असे सांगून ८ नोव्हेंबरला घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय दोन्ही मुलींचा शोध लागला. त्या पुण्यातील एका नातेवाइकांकडे गेल्याचे समजल्यानंतर त्यांना पोलिस आणि नातेवाइकांनी परत आणले.
त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी शाळेत कमी गुण मिळत असल्याने पुण्यात काम करून शाळा शिकू या, या उद्देशाने गेलो असल्याचे सांगितले. याबाबत महिला दक्षता समिती आणि महिला पोलिस अधिकारी यांच्यासमोर त्यांचा रीतसर जबाब होणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दिली.
शहरातील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या या दोघी मैत्रिणी ८ नोव्हेंबरला शाळेला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडल्या; परंतु त्या शाळेला गेल्या नाहीत आणि घरीही परतल्या नाहीत. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांचा शोध घेऊन मुली बेपत्ता झाल्याची फिर्याद गावभाग पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, त्यातील एकीच्या पुण्यातील मामांच्या नातेवाइकांकडे त्या पोहोचल्यानंतर ही माहिती पालकांना समजली. त्यांनी पोलिसांना कळवून पुण्यातून दोघींना सुखरूप परत आणले.
त्यावेळी त्यांना अधिक माहिती विचारली असता शाळेत सहामाही परीक्षेत कमी गुण मिळाल्याने घरात रागावतात म्हणून आम्ही पुण्याला गेल्याचे सांगितले. तसेच इचलकरंजी ते पुणे स्वारगेट तेथून वाघोली आणि भोसरी असा प्रवास करून नातेवाइकांकडे पोहोचल्याचे सांगितले. परंतु संपूर्ण घटनाक्रम आणि तपास हा महिला दक्षता समितीसमोर होणार आहे.
सोशल मीडियावर ॲक्टिव्ह
या दोघी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह होत्या. या सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीवरूनच त्यांनी असे धाडस केले असल्याची शक्यता आहे. त्यातील एका मुलीचे वडील हॉटेलमध्ये काम करतात, तर दुसऱ्या मुलीचे वडील यंत्रमाग कामगार आहेत.