गणेशमूर्तींचे बुकिंग सुरू, आता कसली प्लास्टर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:41+5:302021-08-27T04:27:41+5:30

कोल्हापूर : गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर आल्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विक्री बंदीचा निर्णय फार्सच ठरला आहे. सध्या जिल्ह्यातच ...

Booking of Ganesh idols started, now no plaster ban | गणेशमूर्तींचे बुकिंग सुरू, आता कसली प्लास्टर बंदी

गणेशमूर्तींचे बुकिंग सुरू, आता कसली प्लास्टर बंदी

कोल्हापूर : गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर आल्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विक्री बंदीचा निर्णय फार्सच ठरला आहे. सध्या जिल्ह्यातच नव्हे, राज्यात सर्वत्र गणेशमूर्ती तयार असून, त्यांचे बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे यंदाही प्लास्टरमुक्त गणेशोत्सव होण्याची सुतराम शक्यता नाही. पण शासनाने यावर कायमस्वरुपी ठोस निर्णय द्यावा, यासाठी गणेशोत्सवानंतर कुंभार समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य शासनाने प्लास्टरच्या गणेशमूर्तींवर बंदी आणली आहे, पण कोरोना काळात कुंभारांनी प्लास्टरच्या गणेशमूर्ती तयार केल्या असून, त्या विक्रीस परवानगी मिळावी, अशी याचिका नागपूर खंडपीठाकडे करण्यात आली होती. त्यावर बुधवारी निकाल देत खंडपीठाने या मूर्तींची विक्री करता येणार नाही, असे स्पष्ट करून शासनाचा निर्णय कायम ठेवला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण असलेला गणेशोत्सव यंदा १० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्याआधी म्हणजे फेब्रुवारी-मार्च महिन्यातच कुंभार बांधव गणेशमूर्ती बनवायला सुरू करतात. ऐनवेळी बनवलेल्या गणेशमूर्ती वाळत नाही म्हणून उन्हाळ्यातच हे काम सुरू होते. त्यावेळी वारंवार कुंभारांनी शासनाला गणेशमूर्तीबाबतचा निर्णय स्पष्ट करा, अशी मागणी केली होती. मात्र तेव्हा शासनाकडून कोणतेही निर्देश आले नाहीत. अखेर कुंभारांनी त्यांचा सोयीस्कर ठरेल असा निर्णय घेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनवायला सुरुवात केली; पण आता गणेशोत्सव १५ दिवसांवर आला आहे आणि प्लास्टरच्या गणेशमूर्ती तयार होऊन त्यांचे स्टॉल लागले आहेत, बुकिंग सुरू झाले आहे. त्यामुळे यंदादेखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्याची शक्यता नाही.

--

भाविकांपुढे तीन पर्याय

प्लास्टरच्या मूर्तींवर बंदी आली, तर पर्याय असावा म्हणून जिल्ह्यातील बहुतांश कुंभारांनी प्लास्टर व मातीमिश्रित गणेशमूर्ती बनवल्या आहेत. यात प्लास्टरचे प्रमाण ७० टक्क्यांवर आणि माती केवळ मूर्ती लाल रंगाची दिसावी, अशा पद्धतीने वापरली आहे. आता भाविकांनी ठरवायचे आहे की आपल्याला प्लास्टरची मूर्ती हवी आहे, शाडूची हवी की मिश्र गणेशमूर्ती हवी. प्रत्येकाचे दरही वेगवेगळे आहेत.

----

आम्ही शासनाला वारंवार सांगत आहोत की प्लास्टरने प्रदूषण होत नाही; पण ते ऐकायला तयार नाहीत. हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे. प्लास्टर बंदी म्हणजे आमच्या व्यवसायावर गदा आहे, जे आम्ही कोणत्याही परिस्थितीत मान्य करणार नाही. हा निर्णय घ्यायचाच असेल, तर शासनाने आमच्या मुलांना नोकरीवर घ्यावे. कर्ज काढून आम्ही गणेशमूर्ती बनवतो, वर्षभराचा चरितार्थ त्यावर चालतो. एवढा गणेशोत्सव शांततेत पार पाडू, त्यानंतर आम्ही जिल्हास्तरावर तीव्र आंदाेलन छेडणार आहोत.

मारुतराव कातवरे,

जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समिती

--

अंमलबजावणी कशी होणार...

नुकत्याच आलेल्या महापुराने आधीच गणेशमूर्तींचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यासाठी कसेबसे पुरतील एवढ्या गणेशमूर्ती सध्या कुंभारांकडे आहेत. प्लास्टर मूर्तीवर बंदी आणली, तर एवढ्या मोठया संख्येने शाडूच्या मूर्ती बनवण्याइतका वेळ नाही, त्यामुळे या निर्णयाची अंमलबजवाणी कशी होणार, महापालिका- जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार, हे स्पष्ट झालेले नाही.

---

फोटो नं २६०८२०२१-कोल-गणेशमूर्ती

ओळ : कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्लीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार असून, त्यांचे रंगकाम सुरू होत आहे. (छाया : नसीर अत्तार)

---

Web Title: Booking of Ganesh idols started, now no plaster ban