कोल्हापुरातील 'सीपीआर'मध्ये रक्त तपासणीचे रॅकेट; खासगी लॅब चालकांशी संगनमत, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:50 IST2025-11-28T11:50:33+5:302025-11-28T11:50:54+5:30
दोन-अडीच हजार रुपयांच्या वसुलीची तक्रार

कोल्हापुरातील 'सीपीआर'मध्ये रक्त तपासणीचे रॅकेट; खासगी लॅब चालकांशी संगनमत, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा आरोप
कोल्हापूर : येथील सीपीआरमध्ये काही डॉक्टर खासगी रक्त तपासणी लॅबशी संगनमत करून नातेवाइकांची आर्थिक लुबाडणूक करत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी केला आहे. त्यांनी गुरुवारी सीपीआरमध्ये जाऊन एका नातेवाइकांकडून खासगी लॅब चालक दोन ते अडीच हजार रुपयांपर्यंत पैसे घेतल्याचे उघड केले.
सीपीआरमध्ये रक्त चाचणी होत असताना खासगी लॅब चालकांना बोलावून काही डॉक्टर कमिशन गोळा करीत आहेत, असा आरोपही पाटील यांनी केला आहे. या प्रकरणी दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
पाटील यांनी सांगितले, सीपीआरमध्ये स्वतःची रक्त तपासणीची लॅब आहे. तरीही रक्तातील तपासण्या करण्यासाठी खासगी लॅब चालकांना बोलावून रुग्णांच्या नातेवाइकांकडून प्रत्येक चाचणीसाठी हजारो रुपये उकळण्याचा उद्योग डॉक्टर करीत आहेत. रक्त तपासणीचा अहवालही रुग्णाच्या नातेवाईक किंवा रुग्णाला न देता डॉक्टरांच्या व्हॉटसॲपवर पाठवतात.
गुरुवारी अचानकपणे सीपीआरमध्ये गेल्यानंतर एका तासात सुमारे २५ ते ३० रुग्णांच्या नातेवाइकांनी रक्त व इतर तपासण्यासाठी ड्युटीवर असणाऱ्या सीपीआरमधील डॉक्टरांनी बाहेरून लॅब चालकांना बोलावून प्रत्येक तपासणीसाठी पैसे घेतल्याचे निदर्शनास आणून दिले.
एका प्रसूती विभागातील ही आकडेवारी आहे. गरीब रुग्ण सीपीआरमध्ये उपचारासाठी पैसे नसल्याने येतो. अशा रुग्णांच्या नातेवाइकांकडून रक्त तपासणीसाठी खासगी लॅब चालकांना पुढे करून सीपीआरमधील काही डॉक्टर कमाई करत असल्याची तक्रार त्यांनी केली.
खासगी रक्त तपासणी लॅब चालकांना शासकीय रुग्णालयात येण्यास परवानगी नाही. तरीही सीपीआरमध्ये आलेल्या लॅब चालकांची स्वतंत्र चौकशी समिती नेमून चौकशी केली जाईल. या प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल. - सदानंद भिसे, अधिष्ठाता, सीपीआर, कोल्हापूर.