डेंग्यूच्या डासांनी शोषला कोल्हापूर जिल्ह्याचा रक्तसाठा; रुग्णांची हेळसांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 19:31 IST2025-06-16T19:30:15+5:302025-06-16T19:31:37+5:30

डेंग्यूच्या साथीने प्लेटलेटसच्या मागणीत वाढ : ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण संख्येत वाढ

Blood shortage in blood banks in Kolhapur district | डेंग्यूच्या डासांनी शोषला कोल्हापूर जिल्ह्याचा रक्तसाठा; रुग्णांची हेळसांड

डेंग्यूच्या डासांनी शोषला कोल्हापूर जिल्ह्याचा रक्तसाठा; रुग्णांची हेळसांड

कोल्हापूर : उन्हाळी सुटीमुळे रक्तदान शिबिरांची संख्या रोडावल्याने जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता आहे. त्यातच यंदा पावसाने लवकर हजेरी लावल्याने साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यूचे रुग्ण वाढल्याने प्लेटलेटसह संपूर्ण रक्ताच्या मागणीत वाढ झाली आणि पुरवठा कमी असल्याने रुग्णांची हेळसांड होऊ लागली आहे.

प्रत्येक वर्षी मे महिन्यात रक्ताची टंचाई भासते. मात्र, जून मध्ये पुन्हा रक्तपेढ्या फुल्ल हाेतात. यंदा, मान्सून लवकर सुरु झाल्याने साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. त्यात, अद्याप शाळा, महाविद्यालयांना सुटी असल्याने रक्तदान शिबिरे कमी प्रमाणात होत आहेत. याचा एकत्रित परिणाम रक्त संकलनावर झाला आहे.

सध्या पावसाची उघडझाप सुरु आहे. त्यामुळे साथीचे आजार डोकेवर काढत आहेत. ताप, सर्दी, खोकला, जुलाब, अतिसार, उलट्या होणे, पावसाळ्यातील विषाणूजन्य व्याधी म्हणजे मलेरिया, हिवताप, स्वाईन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया, कावीळ, कॉलरा. तसेच सांधेदुखी, अस्थमा, आमवात, पचनाचे आजार, आम्प्लपित्त यासारख्या जुनाट व्याधीदेखील डोके वर काढू लागल्या आहेत.
जिल्ह्यातील सामाजिक संस्था, तरुण मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजू रुग्णांना रक्त वेळेत उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सीपीआर रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या वतीने करण्यात आले आहे.

सीपीआरच्या रक्तपेढीत ९७ पिशव्या

सीपीआर रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण दाखल होतात. यामध्ये विविध साथीच्या आजारांसह अपघातग्रस्तांची संख्याही लक्षणीय असते. या रुग्णांना रक्ताची गरज असते, पण ‘सीपीआर’च्या रक्तपेढीत केवळ ९७ पिशव्या रक्त आहे.

‘निगेटीव्ह’ रक्तच मिळेना

बहुतांशी रक्तपेढ्यांमध्ये ‘ए निगेटीव्ह’, ‘बी निगेटीव्ह’, ‘ओ निगेटीव्ह’, ‘एबी निवेटीव्ह’ या गटातील रक्तच नाही. त्यामुळे हे रक्तगट असणाऱ्या रक्तदात्यांनी स्वत:हून रक्त द्यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सीपीआर रक्तपेढीतील शिल्लक रक्त

रक्त गट  - व्होल रक्त - पीसीव्ही  - एकूण - एफएफपी
ए पॉझिटिव्ह  - ०२  - ०९  - ११ - ११
ए निगेटीव्ह   - ००  - ००  - ००  - ००
बी पॉझिटिव्ह - ००- ०७  - ०७ - ०४
बी निगेटीव्ह -  ००- ०४ - ०४ - ००
ओ पॉझिटिव्ह -  ०० - १७  -१७ - ५९
ओ निगेटीव्ह - ०० - ०३  - ०३  - ०७
एबी पॉझिटिव्ह - ०० - ०५  - ०५  - १५
एबी निगेटीव्ह -  ०० -  ०० -  ०० - ०१

Web Title: Blood shortage in blood banks in Kolhapur district