Kolhapur Politics: भाजप मते घेण्यात, तर राष्ट्रवादी 'जागात' भारी; पक्षनिहाय मतदान...जाणून घ्या
By राजाराम लोंढे | Updated: February 14, 2026 16:03 IST2026-02-14T16:00:29+5:302026-02-14T16:03:09+5:30
दुसऱ्या क्रमांची मते घेऊनही राष्ट्रवादी ठरली अव्वल : कोरे, नरके, माने, शिवाजीराव पाटील यांना करावी लागणार नव्याने बांधणी

Kolhapur Politics: भाजप मते घेण्यात, तर राष्ट्रवादी 'जागात' भारी; पक्षनिहाय मतदान...जाणून घ्या
राजाराम लोंढे
कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ३ लाख ४२ हजार मते घेतली असली तरी जागा मात्र १२ मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने ३ लाख ४१ हजार ३१ मते घेत सर्वाधिक २० जागा जिंकून जिल्ह्यावरील आपली पकड घट्ट केली आहे. या निवडणुकीत विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षांच्या उमेदवारांना मिळालेली मते पाहता, विनय कोरे, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, शिवाजीराव पाटील यांना मतदारसंघात आगामी चार वर्षांत नव्याने बांधणी करावी लागणार आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर सव्वा वर्षाने झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. त्यात या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल नऊ वर्षांनी होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी ताकदीने लढवल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या ६८ जागांपैकी सर्वाधिक ४१ जागा भाजपने लढवल्या होत्या. महायुती व महाविकास आघाडीने सोयीनुसार आघाड्या केल्या असल्या तरी या निवडणुकीतून प्रत्येक पक्षाची ताकद समजली आहे.
भाजपची स्वबळाची तयारी...
भाजपने जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक ४१ जागांवर उमेदवार दिले होते. त्यातही सर्वच्या सर्व बारा तालुक्यांत त्यांनी उमेदवार उभा करून पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहचण्याचा प्रयत्न केला. आगामी लोकसभा व विधानसभेची तयारी म्हणून भाजपने या निवडणुकीकडे पाहिले आहे. यातून त्याची स्वबळाची तयारी दिसते; पण ‘करवीर’विधानसभा मतदारसंघात त्यांनी चार जिल्हा परिषदेच्या आणि ९ पंचायत समितीच्या जागा लढवल्या होत्या, येथे त्यांना यश आले नाही.
‘करवीर’, ’राधानगरी’ काँग्रेसने घेतली लक्ष्यवेधी मते
काँग्रेसने ‘करवीर’, ‘राधानगरी’ व ‘हातकणंगले’ विधानसभा मतदारसंघात लक्ष्यवेधी मते घेतली. ‘करवीर’मध्ये ५९ हजार, ‘राधानगरी’मध्ये ७२ हजार ९२५ तर हातकणंगलेत ५८ हजार ८२८ मते घेतल्याने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा निकाल ठरला आहे.
नरकेंच्या जागा कमी; पण मते अधिक
करवीर विधानसभा मतदारसंघात आमदार चंद्रदीप नरके यांच्या जागा कमी झाल्या असल्या तरी शिंदेसेनेच्या उमेदवारांनी तब्बल ९१ हजार ८२९ मते घेतली आहेत. येथे भाजपने ऐन वेळी हात सोडूनही त्यांनी राष्ट्रवादी, भाजप, जनसुराज्य विरोधात एकाकी झुंज दिली. राष्ट्रवादीने ६९ हजार ४०४ तर भाजपने १९ हजार ७८६ व जनसुराज्य पक्षाने ३१ हजार मते घेतली.
अशी मिळालेली पक्षनिहाय मतदान...
| पक्ष | लढवलेल्या जागा | विजयी जागा | मिळालेली मते |
| भाजप | ४१ | १२ | ३ लाख ४२ हजार ९४० |
| राष्ट्रवादी | ४० | २० | ३ लाख ४१ हजार ०३१ |
| काँग्रेस | ३८ | १४ | २ लाख ८४ हजार २०५ |
| शिंदेसेना | ३२ | ०९ | ३ लाख ९ हजार १२१ |
| जनसुराज्य | १२ | ०५ | १ लाख ५७ हजार ५७० |
| उद्धवसेना | १३ | ०१ | ५५ हजार ८९८ |
| स्वाभिमानी | ०५ | ०१ | ३४ हजार १४० |
| शाहू आघाडी (शिरोळ) | ०७ | ०४ | ५८ हजार १८ |
| शिवशाहू (भुदरगड) | ०४ | ०१ | ४१ हजार ७९४ |