बहुमताच्या जोरावर आम्ही काही करू शकतो अशा पद्धतीचे भाजपचे नियोजन - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:25 IST2025-12-17T16:23:45+5:302025-12-17T16:25:46+5:30
'..त्यामुळे मंत्री कोकाटेंवर कारवाई होणार नाही'

बहुमताच्या जोरावर आम्ही काही करू शकतो अशा पद्धतीचे भाजपचे नियोजन - सतेज पाटील
कोल्हापूर : केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या नावाने असणाऱ्या मनरेगाचे नाव बदलल्याने कोल्हापुरातील इंडिया आघाडीच्यावतीने पापाची तिकटी येथे केंद्र सरकारविरोधात निर्दशने करण्यात आली. काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात इंडिया आघाडीतील कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आमदार सतेज पाटील म्हणाले, मनरेगा योजनेच्या माध्यमातून महात्मा गांधी यांची चिरंतन आठवण देशभरातील गरिबांसाठी होती. तेच पुसण्याचे पाप भाजपने केले आहे. त्याचा निषेध आहे. सभागृहात देखील विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांनी हे बिल जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे पाठवा अशा पद्धतीची मागणी केली आहे. पण बहुमताच्या जोरावर या देशात आम्ही काही करू शकतो अशा पद्धतीचे नियोजन भाजपचे सुरू आहे.
प्रज्ञा सातव तडकाफडकी निर्णय घेतील अस वाटत नाही
हिंगोली येथील काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी समोर आली आहे. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, मला सकाळी अनेक लोकांचे फोन आले, मी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही त्या पक्ष सोडतील. अगदी कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आमदारकी देण्याबाबतची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली होती. त्यामुळे मला वाटत नाही अशा प्रकारे तडकाफडकी निर्णय घेतील.
महापालिकेत आघाडीबाबत 'वंचित'चा प्रस्ताव नाही
महापालिका निवडणुकीत आघाडीबाबत राज्यपातळीवर काही चर्चा सुरू आहेत, स्थानिक पातळीवर काही लोकांच्या अड्जस्टमेंट झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये वंचितचा आमच्याकडे तसा कोणताही प्रस्ताव नाही.
..त्यामुळे कोकाटेंवर कारवाई होणार नाही
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहेत. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, काहीही होणार नाही, केंद्र सरकार, राज्य सरकार पाठीशी आहे. त्यामुळे शिरसाट असू देत किंवा कोकाटे यांच्यावर कारवाई होणार नाही. हे सरकार हे संवेदनशील आहे असे वाटत नाही. कोणावर कारवाई होतील अशी अपेक्षा जनतेने सोडून दिली असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
मुंबईचा विषय वेगळा
मुंबई महानगरपालिकेत आघाडीबाबत बोलताना पाटील म्हणाले, मुंबईचा अन् महाराष्ट्राचा विषय वेगळा आहे. मुंबईमध्ये स्थानिक लोकांची मतमतांतरे वेगवेगळी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची भूमिका स्वतंत्र जाण्याची भूमिका आहे. पण महाराष्ट्रात आम्ही अनेक ठिकाणी एकत्र आहोत. पुण्यात एकत्र आहोत सांगलीत एकत्र आहोत अनेक राज्यातल्या महत्त्वाच्या शहरात एकत्र असल्याचे सांगितले.