शिंदे-पवार यांच्यात कुरघोड्यांसाठी भाजपचा गट कार्यान्वित, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:32 IST2025-11-07T16:31:46+5:302025-11-07T16:32:22+5:30
दुबार नावांच्या मतदार याद्या राजकीय पक्षांना द्या

शिंदे-पवार यांच्यात कुरघोड्यांसाठी भाजपचा गट कार्यान्वित, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा दावा
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच भाजपला आता मित्रपक्षांच्या कुबड्यांची गरज नसल्याचे विधान केले होते. त्याची परिणती सध्या दिसून येत असून शिंदेसेना अन् अजित पवार गटामध्ये कुरघोड्या लावण्यासाठी भाजपमधील गट कार्यान्वित असल्याचा आरोप विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला.
महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांच्या भानगडी बाहेर येऊ लागल्या आहेत. या पक्षांमध्ये कुरघोड्या लावण्यासाठी भाजपमधीलच एक गट कार्यान्वित असल्याचे आमदार पाटील म्हणाले. खासदार शाहू छत्रपती यांनी कोल्हापूरच्या प्रश्नांची सत्ताधाऱ्यांना जाणीव करून दिली; पण उपमुख्यमंत्र्यांनी शाहू छत्रपती यांच्या प्रश्नांना बगल देत काउंटर करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या काळात श्री अंबाबाई विकास आराखड्यासाठी निधी आला होता. त्यानंतर केवळ अध्यादेश आणि घोषणा झाल्या. एक रुपयाचाही निधी दिला नसल्याचा दावा आमदार पाटील यांनी केला.
सरकार त्यांचे मग हद्दवाढ का थांबली?
राज्यात महायुतीचे सरकार आहे. कोल्हापुरात दोन आमदार त्यांचे आहेत, सत्ता त्यांची आहे. मग हद्दवाढ का थांबली? असा प्रतिसवाल आमदार सतेज पाटील यांनी केला. बुधवारी कोल्हापुरात झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हद्दवाढ करा, विरोध कशाला करता, असा सवाल केला होता. त्याला आमदार पाटील यांनी प्रतिसवाल करत उत्तर दिले.
दुबार नावांच्या मतदार याद्या राजकीय पक्षांना द्या
मतदार याद्यांमध्ये दुबार नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून दुबार नावांना डबल स्टार केल्याचे सांगितले आहे. या डबल स्टार मतदार याद्या राजकीय पक्षांना द्याव्यात, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.