Kolhapur: गणेशोत्सवाला कोकणात जाण्यापूर्वीच भोजने कुटुंबावर काळाचा घाला, गॅस स्फोटाने कुटुंब उद्ध्वस्त
By उद्धव गोडसे | Updated: August 27, 2025 12:11 IST2025-08-27T12:10:51+5:302025-08-27T12:11:28+5:30
चिमुकल्यांचा आक्रोश काळीज पिळवटणारा

Kolhapur: गणेशोत्सवाला कोकणात जाण्यापूर्वीच भोजने कुटुंबावर काळाचा घाला, गॅस स्फोटाने कुटुंब उद्ध्वस्त
उद्धव गोडसे
कोल्हापूर : कळंबा कारागृहाजवळ एलआयसी कॉलनीत राहणारे अमर भोजने यांची आई चार दिवसांपूर्वीच गणेशोत्सवाच्या तयारीसाठी कोकणातील मूळ गावी देवरुखला गेल्या. विघ्नहर्त्या गणपती बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. मंगळवारी ते पत्नी, मुले आणि वडिलांना घेऊन गावाकडे जाणार होते. तत्पूर्वीच काळाने घातला आणि घरगुती गॅसच्या स्फोटात भोजने कुटुंबीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
अमर भोजने हे मूळचे कोकणातील देवरुखचे. दहा वर्षांपूर्वी हे कुटुंब कोकणातून कोल्हापुरात आले. अमर हे उत्तम स्वयंपाकी असल्याने त्यांना शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये कूकची नोकरी मिळाली. कष्ट करून भोजने कुटुंबीयांनी कळंबा कारागृहामागील एलआयसी कॉलनीत छोटेखानी घर खरेदी केले. हॉल, कीचन, बेडरूम अशा स्वत:च्या घराचा आनंद आणि अभिमानही या कुटुंबाला होता. कॉलनीत सर्वांमध्ये मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे त्यांनी शेजाऱ्यांना आपलेसे केले होते.
वाचा - गॅस स्फोटातील जखमी महिलेचा मृत्यू, गॅस पुरवठा कंपनीच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू
दरवर्षीप्रमाणे यंदाही आठवडाभर आधीच या कुटुंबाला गणेशोत्सवाचे वेध लागले होते. अमर यांच्या आई चार दिवसांपूर्वीच पूर्वतयारीसाठी गावाकडे गेल्या. मुलाची शाळा असल्याने मंगळवारी इतरांना घेऊन गावाकडे जाण्याचा निर्णय अमर यांनी घेतला होता. गणपतीच्या सजावटीची तयारीही जोरात सुरू होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरवठा होणार असल्याने गृहिणी शीतल यांना आनंद होता. मोठ्या उत्साहात त्यांनी सोमवारी सायंकाळी कनेक्शन जोडून घेतले. मात्र, कर्मचाऱ्यांनी घाईगडबडीत पाइपलाइनला लॉकच लावले नाही. मुख्य वाहिनीतून आलेला गॅस भोजने यांच्या घरात पसरला. त्याला वास नसल्याने हा प्रकार लक्षातच आला नाही. पावणेअकराच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला आणि भोजने एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.
शीतल यांच्यासह त्यांचे सासरे अनंत भोजने, मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिका हे चौघेही गंभीर जखमी झाले. शेजाऱ्यांनी त्यांना खासगी वाहनातून सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान शीतल यांचा मृत्यू झाल्याने भोजने कुटुंबाला धक्का बसला. तसेच शेजारी हळहळले.
मुलांचा आक्रोश; हतबल बाप
गॅसच्या स्फोटात पत्नीचा मृत्यू झाला. वडील गंभीर आहेत, तर दोन्ही मुले आगीत होरपळल्याने त्यांची तगमग बघवत नाही. वेदनेने आक्रोश करणाऱ्या मुलांकडे पाहताच वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. त्यांच्या हतबल अवस्थेने सीपीआरमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचेही हृदय हेलावले.