सख्खे दोस्त बनले पक्के वैरी, एकमेकांवर केला हल्ला; एक ठार, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 23:34 IST2026-03-09T23:33:53+5:302026-03-09T23:34:06+5:30
Kolhapur Crime News: तारदाळ (ता.हातकणंगले) येथील मुख्य चौकात जुन्या मित्रांत पूर्वीच्या किरकोळ वादातून एकमेकांवर धारदार हत्याराने वार केल्याची घटना घडली. त्यामध्ये एकजण ठार झाला, तर दुसरा जखमी आहे. जावीद रशीद मुजावर (वय २२, रा. संगमनगर-तारदाळ) असे ठार झालेल्याचे नाव आहे.

सख्खे दोस्त बनले पक्के वैरी, एकमेकांवर केला हल्ला; एक ठार, एक जखमी
इचलकरंजी : तारदाळ (ता.हातकणंगले) येथील मुख्य चौकात जुन्या मित्रांत पूर्वीच्या किरकोळ वादातून एकमेकांवर धारदार हत्याराने वार केल्याची घटना घडली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. जावीद रशीद मुजावर (वय २२, रा. संगमनगर-तारदाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. यश तानाजी गायकवाड (१९, रा. तारदाळ) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्दळीच्या ठिकाणी सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शहापूर पोलिस ठाण्यात सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तारदाळ गावातील नागनाथ मंदिर या मुख्य चौकात असलेल्या एका पानपट्टीसमोर जावीद व यश यांच्यात सोमवारी सायंकाळी वाद झाला. दोघांच्यात जोरदार झटापट सुरू झाली. त्यात यश याच्या हाताला घाव बसला. झटापटीत त्याने जावीदवर सपासप वार केले. जखमी अवस्थेत जावीद हा जीव वाचविण्यासाठी घटनास्थळावरून सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या गणेशमंदिर परिसरात मोकळ्या जागेवर गेला.
त्यापाठोपाठ यशही त्याचा पाठलाग करत तेथे जाऊन पुन्हा त्याच्यावर वार केला. या घटनेत जावीद याच्या छातीवर, मानेवर, पोटावर व हातावर असे वार झाल्याने तो जागीच कोसळला. तेथून गंभीर जखमी अवस्थेत जावीद याला ग्रामस्थांनी उपचारासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनेनंतर तारदाळ गावात एकच खळबळ उडाली. त्याबरोबर घटनास्थळ व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच हल्ल्याप्रकरणी यश याला ताब्यात घेतले. दोघांच्यात झालेल्या झटापटीमध्ये यशही जखमी झाला असल्याने त्याला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथक
घटनास्थळावरील पंचनामा करण्यासह फॉरेन्सिक पथक (न्यायवैधिक तपासणी पथक) बोलावून पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे घेतले. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी भेट दिली.
क्रिकेट आणि निवडणुकीचा वाद
जावीद व यश हे दोघे पूर्वी एकमेकांचे चांगले मित्र होते. आठ महिन्यांपूर्वी क्रिकेट खेळातून दोघांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर जि. प. निवडणुकीतही दोघे वेगवेगळ्या पक्षांतून कार्यकर्ते म्हणून प्रचार करीत होते. त्यावेळीही किरकोळ वाद झाला. त्यातून दोघांच्यात खुन्नस वाढत गेली. तारदाळ यात्रेपूर्वी या दोघांच्यात वाद झाला होता. हा वाद विकोपाला जाण्यापूर्वीच गावातील काहींनी मध्यस्थी करत वाद मिटवला होता. त्यामुळे यात्रेत वाद होईल, अशी स्थिती होती, ती मावळली. सर्व काही मिटल्यासारखे असताना सोमवारी अचानक दोघांच्यात पुन्हा वाद उफाळून आला आणि हाणामारीत एकाचा जीव गेला. या घटनेची चर्चा गावभर सुरू होती.