Kolhapur News: गोंडस चिमुकल्याला जन्म दिला, घरी आनंदाचे वातावरण; तोच..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 16:06 IST2025-11-21T16:06:15+5:302025-11-21T16:06:33+5:30
दुधाळी येथील जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर, हॉस्पिटल प्रशासनाबद्दल नाराजी

Kolhapur News: गोंडस चिमुकल्याला जन्म दिला, घरी आनंदाचे वातावरण; तोच..
कोल्हापूर : दुधाळी परिसरातील हसत्याखेळत्या जाधव कुटुंबात चिमुकल्याच्या रुपाने नव्या पाहुण्याचे आगमन झाले होते. घराचे गोकुळ झाल्याचा आनंद जाधव आजी-आजोबांकडून सुरू होता. तोच पंचगंगा हॉस्पिटलमध्ये चक्कर येऊन पडल्याचे निमित्त झाले आणि चिमुकल्या बाळाची आई प्रसूतीनंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी देवाघरी गेली. या घटनेने नवजात चिमुकला आईच्या मायेला पोरका झाला.
घडले असे की, दुधाळी येथील रंकाळा टॉवर परिसरात राहणाऱ्या शिवानी (वय २५) यांचे दोन वर्षांपूर्वी सराफ व्यावसायिक निखिल जाधव यांच्याशी लग्न झाले होते. पती आणि सासू, सासऱ्यांसोबत शिवानी यांचे चौकोनी कुुटुंब आनंदात होते. शिवानीची गर्भधारणा झाल्यानंतर नव्या पाहुण्याच्या चाहुलीने घराचा आनंद द्विगुणित झाला होता. सोमवारी (दि. १७) दुपारी त्यांना प्रसववेदना सुरू झाल्या.
तातडीने त्यांना पंचगंगा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सायंकाळी सिझर करण्याचा निर्णय झाला. सिझर झाले अन् एका गोंडस चिमुकल्याने जन्म घेतला. घरात पाळणा हलल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर होता. बाळाच्या बाबासह आजी-आजोबांनी चिमुकल्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
पंचगंगा हॉस्पिटलमध्ये गुरुवारी (दि. २०) पहाटे पाचच्या सुमारास बेड बदलताना शिवानी यांना चक्कर आली. चक्कर येऊन पडल्याचे निमित्त झाले. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी त्यांना सीपीआरमध्ये हलवले. सीपीआरमध्ये उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. काही क्षणात आनंदाचे रूपांतर दु:खात झाले. आनंदाचे अश्रू दु:खाचे बनले. या घटनेने जाधव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
बाळ खासगी रुग्णालयात
अवघ्या तीन दिवसांत आईच्या मायेला पोरक्या झालेल्या बाळाला नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. दोन्हीकडील आजी-आजोबा बाळाची काळजी घेत आहेत. या घटनेने शिवानी यांचे माहेर आणि सासर या दोन्ही ठिकाणी हळहळ व्यक्त होत आहे.
हॉस्पिटलबद्दल नाराजी
पंचगंगा हॉस्पिटलबद्दल शिवानी यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. थंडीच्या दिवसात एवढ्या पहाटे बेड बदलण्याची काय गरज होती? सिझरनंतर डॉक्टरांनी योग्य खबरदारी घेतली नाही. तब्येत ठणठणीत असताना अचानक शिवानी यांना चक्कर कशी काय आली? असे प्रश्न नातेवाईकांनी उपस्थित केले आहेत.