Kolhapur: चंदगडच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ येताच, शिवाजीराव ‘गडहिंग्लज’मध्ये; ‘राष्ट्रवादी’ला रोखण्याची व्यूहरचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:08 IST2025-11-13T16:01:49+5:302025-11-13T16:08:51+5:30
Local Body Election: ‘भाजपा’ला जनता दल - जनसुराज्यसोबत जाण्याची सूचना

Kolhapur: चंदगडच्या राजकारणात मंत्री मुश्रीफ येताच, शिवाजीराव ‘गडहिंग्लज’मध्ये; ‘राष्ट्रवादी’ला रोखण्याची व्यूहरचना
राम मगदूम
गडहिंग्लज : चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. त्यामुळे भाजपाचे आमदार शिवाजीराव पाटील आता ‘राष्ट्रवादी’ला रोखण्यासाठी ‘गडहिंग्लज’च्या मैदानात उतरण्याचे संकेत आहेत. त्यांनी गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना ‘जनता दल - जनसुराज्य’सोबत जाण्याची स्पष्ट सूचना दिल्याचे खात्रीलायकरित्या समजते.
सोमवारी (दि. १०) चंदगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे अजित पवार व शरद पवार हे दोन्ही गट एकत्र आले. चंदगड नगरपंचायतीची निवडणूक राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याची घोषणा खुद्द मंत्री हसन मुश्रीफ यांनीच पत्रकार परिषदेत केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठीच आमदार पाटील ताकदीने ‘गडहिंग्लज’च्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
बुधवारी (१२) जनता दलाच्या नेत्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीसंदर्भातील घडामोडींबाबत त्यांना अवगत केले. यावेळी भाजपाचे समन्वयक संतोष तेली, गडहिंग्लज मंडल अध्यक्ष प्रीतम कापसे यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व निवडणुकीत ताकद
आमदार पाटील यांनी चर्चेस उपस्थितांना समक्ष आणि अनुपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांना मोबाइलवरून संपर्क साधून ‘जद’सोबतच जाण्याचा सल्ला दिला. तसेच गडहिंग्लज पालिकेसह आगामी सर्व निवडणुकीत ताकदीनिशी पाठिशी उभे राहण्याचा ‘शब्द’ दिल्याचे समजते.
भाजपाला ६ जागा देणार
चर्चेत गडहिंग्लज नगरपालिकेच्या २२पैकी ६ जागा भाजपाला देण्याची तयारी प्रा. कोरी यांनी दाखवल्याचे समजते. मात्र, त्या कोणत्या ? यासंबंधीचा निर्णय वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाणार आहे.
‘जि. प., पं.स.’तही पडसाद!
‘जनसुराज्य’चे संस्थापक आमदार विनय कोरे यांनीच जनता दल-जनसुराज्य आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, भाजपाचा निर्णय मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्या हाती आहे. त्यांचा ‘निर्णय’ पक्का करण्यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांनीही ‘ताकद’ लावली असून, आगामी जि. प., पं. स. निवडणुकीतही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
भाजपा कुणासोबत जाणार ?
गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीसोबत यावे, यासाठी मंत्री मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. भाजपाच्या दोन इच्छुकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत प्रचारही सुरू केला आहे. त्यामुळे भाजपा कुणासोबत जाणार ? याची उत्सुकता गडहिंग्लजसह जिल्ह्याला लागली आहे.