किती ही बेरोजगारी... पोलिसांच्या ८८ जागांसाठी कोल्हापुरात तब्बल सात हजार अर्ज
By उद्धव गोडसे | Updated: January 15, 2026 11:34 IST2026-01-15T11:34:04+5:302026-01-15T11:34:51+5:30
निवडीसाठी कस लागणार : सरासरी एका जागेसाठी ७९ उमेदवारांमध्ये होणार रस्सीखेच

संग्रहित छाया
उद्धव गोडसे
कोल्हापूर : जिल्हा पोलिस दलात रिक्त असलेल्या ८८ जागांसाठी तब्बल सात हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून अर्जांची माहिती जिल्हा पोलिस दलास प्राप्त झाली. मोठ्या संख्येने अर्ज आल्याने एका जागेसाठी ७९ उमेदवारांमध्ये स्पर्धा असेल. स्पर्धेमुळे निवड प्रक्रियेत उमेदवारांचा कस लागणार आहे. लवकरच शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यात १५ हजार ३०० पोलिसांची पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूर पोलिस दलात रिक्त असलेल्या ८८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी ७ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत होती. ८८ जागांसाठी तब्बल सात हजार अर्ज आले आहेत. महासंचालक कार्यालयाकडून अर्जांची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाली. मोठ्या संख्येने अर्ज आल्यामुळे एका जागेसाठी सुमारे ७९ उमेदवारांमध्ये स्पर्धा असेल.
यातून स्वत:ला सिद्ध करून खाकी वर्दी अंगावर चढविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उमेदवारांचा कस लागणार आहे. भारत राखीव बटालियनमध्ये ३१ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी आलेल्या अर्जांची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. शारीरिक चाचणीसाठी मैदाने सज्ज करण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे.
शारीरिक चाचणीत लागणार कस
शारीरिक चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांना उपलब्ध जागांच्या एकास दहा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी बोलवले जाईल. लेखी परीक्षेला पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना शारीरिक चाचणीत कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. ५० गुणांच्या शारीरिक चाचणीत पुरुषांसाठी १६०० मीटर, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक चाचणी घेतली जाईल. महिला उमेदवारांसाठी ८०० मीटर, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक चाचणी घेतली जाईल.
लेखीही तितकीच महत्त्वाची
शारीरिक चाचणीत पात्र झालेल्या उमेदवारांना १०० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागेल. यात अंकगणित, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, व्याकरण आणि वाहतूक नियमांवर आधारित प्रश्न असतील. शारीरिक चाचणीसह लेखी परीक्षेतही उत्तम गुण मिळवणारे उमेदवार निवड यादीत झळकतात. त्यामुळे उमेदवारांना लेखी परीक्षेचीही जोरदार तयारी करावी लागणार आहे.
उमेदवारांचे फेस रीडिंग
भरतीप्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून उमेदवारांचे फेस रीडिंग केले जाईल. धावण्याच्या चाचणीतील अचूक नोंदींसाठी टॅगिंग सिस्टिमचा वापर केला जाणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली लेखी परीक्षा होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.