..अन्यथा ६ मार्चला कोल्हापुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अडवून जाब विचारू, इंडिया आघाडीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:33 IST2025-02-28T13:32:04+5:302025-02-28T13:33:14+5:30
प्रशांत कोरटकरविरोधात कोल्हापुरात निदर्शने, सरकारचा धिक्कार

..अन्यथा ६ मार्चला कोल्हापुरात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अडवून जाब विचारू, इंडिया आघाडीचा इशारा
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या, इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला सरकारचेच अभय आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे अन् दुसरीकडे त्यांचाच अवमान करणाऱ्यांना सुरक्षा द्यायची हा दुटप्पीपणा महाराष्ट्र सहन करणार नाही. सरकारने कोरटकरला अटक करावी, अन्यथा, येत्या ६ मार्चला कोल्हापुरात येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडवून याचा जाब विचारू, असा इशारा इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी येथे दिला.
कोरटकरविरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी कोरटकर कोण रे, पायतान हाना दोन रे, गुन्हेगाराला संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, उद्ववसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, भारती पोवार, हर्षल सुर्वे, सतीशचंद्र कांबळे प्रमुख उपस्थित होते.
विजय देवणे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान हा स्वाभिमानी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ कोरटकरला अटक करावी, अन्यथा दि. ६ मार्चला त्यांना कोल्हापुरात अडवून याचा जाब विचारु.
भारती पोवार म्हणाल्या, आमच्या दैवताचा अवमान कोण करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार हे छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आले. आता त्यांचा अवमान होत असताना ते का गप्प आहेत..?
हर्षल सुर्वे म्हणाले, जातीयवादी कोरटकरला अटक करा. यावेळी सुनीता पाटील, चंद्रकांत यादव, सचिन चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी दुर्वास कदम, दगडू भास्कर, तौफिक मुलानी, ईश्वर परमार, अवधूत साळोखे, सागर यवलुजे, बबन रानगे, भूपाल शेटे, आनंदा माने, रूपेश पाटील व गीता हसूरकर उपस्थित होते.
सरकारने कोरटकरला पाठीशी घालू नये, त्याच्यावर कारवाई करावी. सरकार कारवाई करेल ही अपेक्षा आहे. - शाहू छत्रपती, खासदार, कोल्हापूर