शाहूनगरात तरुणावर सशस्त्र प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:26 IST2021-04-08T04:26:10+5:302021-04-08T04:26:10+5:30

कोल्हापूर : येथील शाहूनगरमधील नवशा मारुती मंदिर चौकात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सद्दाम सत्तार ...

Armed assault on a youth in Shahunagar | शाहूनगरात तरुणावर सशस्त्र प्राणघातक हल्ला

शाहूनगरात तरुणावर सशस्त्र प्राणघातक हल्ला

कोल्हापूर : येथील शाहूनगरमधील नवशा मारुती मंदिर चौकात तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सद्दाम सत्तार मुल्ला (३५, रा. यादवनगर) असे जखमीचे नाव आहे. हल्ला सराईत गुन्हेगारांसह बारा जणांनी केल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे शाहूनगर परिसरात दहशतीचे वातावरण झाले होते. मंगळवारी रात्री उशिरा घटना घडूनही बुधवारी रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पोलिसांनी रात्री उशिरा संशयितांची धरपकड करून काहीजणांना ताब्यात घेतल्याचे समजते.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सद्दाम मुल्ला हा रात्री जेवण करून शाहूनगर परिसरातील नवशा मारुती मंदिर चौकामध्ये आला. तेथे सराईत गुन्हेगारांसह काही तरुण अगोदरच थांबले होते. यावेळी पूर्ववैमनस्यातून वाद वाढत जाऊन गेंड्या नामक सराईत गुन्हेगारासह दहा ते बारा जणांनी सद्दाम मुल्ला याच्यावर एडक्या, रॉड यासारख्या हत्यारांनी हल्ला केला. अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. मुल्ला याच्यावर प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गंभीर जखमी अवस्थेत सद्दाम मुल्ला याला त्याच्या मित्रांनी राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहचले, तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी रात्रीच संशयित हल्लेखोरांसाठी धरपकड मोहीम राबवली.

संशयावरून केला पाठलाग

पोलीस राजारामपुरी पोलीस ठाण्याबाहेर उभे होते, त्याचवेळी चार दुचाकींवरून भरधाव वेगाने काही तरुण रात्री गेल्याने पोलिसांना शंका आली. काही पोलिसांनी त्यांचा दुचाकीवरून पाठलाग केला; पण त्यापैकी एकच संशयित रात्री पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून एडका हत्यारासह रॉड जप्त केला.

Web Title: Armed assault on a youth in Shahunagar