Kolhapur Crime: प्रेमास नकार दिला, सुपारी देऊन तिची मोपेड जाळली; तरुणास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:45 IST2025-12-27T11:44:50+5:302025-12-27T11:45:56+5:30
अल्पवयीन ताब्यात

Kolhapur Crime: प्रेमास नकार दिला, सुपारी देऊन तिची मोपेड जाळली; तरुणास अटक
कोल्हापूर : तरुणीने प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाला दोन हजार रुपयांची सुपारी देऊन पेट्रोल ओतून इलेक्ट्रिक बाइक पेटविण्यास सांगितल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी वैभव शहाजी कुरणे (वय २७) याला अटक केली.
जुना राजवाडा पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबरला संभाजीनगर परिसरात घरासमोर उभी केलेली इलेक्ट्रिक बाइक रात्रीच्या वेळी अज्ञाताने पेटवल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्या वेळी त्याने कुरणे याच्या सांगण्यावरून हा प्रकार केल्याचे सांगितले.
कुरणे याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. त्या मुलीने प्रेमास नकार दिला म्हणून रागाने त्याने एका मुलाला दोन हजार रुपये, पेट्रोलची बाटली आणि आगपेटी देऊन इलेक्ट्रिक बाइक पेटविण्यास सांगितले. त्याला लांबून ई-बाइकचे ठिकाण दाखविले. त्या मुलाने सीटवर पेट्रोल टाकून बाइक पेटविल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी कुरणे याला अटक केली.