Kolhapur Crime: वारंवार पैसे मागते, घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून प्रेयसीचा केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:58 IST2025-06-13T11:56:43+5:302025-06-13T11:58:11+5:30
पठाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने यापूर्वीच स्वत:च्या पत्नीचा खून केला आहे

Kolhapur Crime: वारंवार पैसे मागते, घेतलेले पैसे परत देत नाही म्हणून प्रेयसीचा केला खून
हातकणंगले : पैशाची वारंवार मागणी करते, दिलेले पैसे परत देत नाही म्हणून चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात हातोडा घालून खून केल्याचा प्रकार अतिग्रे (ता. हातकणंगले ) येथील लॉजवर घडला. सुमन सुरेश सरगर (वय ३५, रा. उचगाव, ता. करवीर ) असे मृत महिलेचे नाव असून तिचा प्रियकर आदम गौस पठाण (वय ४५, रा. घुणकी) याने खून केल्याचे गुरुवारी रात्री ८ वाजता उघडकीस आले. हातकणंगले पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा रात्री उशिरा नोंद झाला असून पठाण याला अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, घुणकीचा रहिवासी असलेल्या आदम पठाण आणि सुमन सरगर यांची एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. गेल्या सात वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. या दरम्यान सुमन हिने आदम याला सात लाख रुपये दिले होते. हे दिलेले पैसे सुमन आदमकडे वारंवार मागत होती.
या कटकटीला कंटाळलेल्या आदमने गुरुवारी सुमनला अतिग्रे येथील एका लॉजवर दुपारी १२ वाजता आणले. सायंकाळपर्यंत हे जोडपे बाहेर न आल्याने लॉजचालकाने संबंधित खोलीचा दरवाजा उघडून पाहिला असता सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. संशयित आरोपी आदम याने सुमन हिच्या डोक्यात हातोड्याचे तीन घाव घालून तिचा खून केला होता.
आदम पठाण लॉजचा दरवाजा उघडताच पळून जात असताना लॉज मालक व कर्मचारी यांनी त्याला पकडून दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
गुन्हेगारी प्रवृत्ती
आदम पठाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने यापूर्वीच स्वत:च्या पत्नीचा खून केला आहे. त्याचा न्यायालयीन खटला सुरू आहे. लॉजच्या खोली मध्येच सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असताना निर्दयी आदम त्या खोलीत सुमारे चार तास गप्प बसून होता. यावरून त्याने नियोजन करून प्रेयसीचा काटा काढल्याचे झाल्याप्रकाराने स्पष्ट झाले आहे.